महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ आणि सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी पार्क ऑफ इंडियात सामंजस्य करार

मुंबई, ‍‍दि.११ : राज्यातील अनुसूचित जाती घटकांतील युवक-युवती तसेच नव उद्योजकांसाठी महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाने महत्त्वाचा निर्णय  घेतला आहे. नागपूर येथे सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी पार्क ऑफ इंडिया सेंटरच्या उद्घाटन प्रसंगी महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ मर्या.,(MPBCDC) आणि सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी पार्क ऑफ इंडिया (STPI) च्या नागपूर सेंटर यांच्यात  महत्त्वपूर्ण सामंजस्य करार (MOU)  झाला आहे.

या करारानुसार  नागपूर सेंटरमधील ५० जागा अनुसूचित जातीच्या युवक – युवतींसाठी राखीव ठेवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे मागासवर्गीय समाजातील नव उद्योजकांना महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या वतीने रेड कार्पेट उपलब्ध झाले आहे. राज्यात प्रथमच सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी क्षेत्रात शासन स्तरावरुन  महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या  माध्यमातून पाऊल पडले आहे.

केंद्र सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय अधिनस्त असलेले सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी पार्क ऑफ इंडिया (STPI) चे नागपूर येथे सेंटर सुरू करण्यात आले आहे. या सेंटरचे उद्घाटन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय चे सहसचिव संकेत भोंडवे, महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक डॉ. अमोल शिंदे,  सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी पार्क ऑफ इंडिया (पुणे)चे संचालक डॉ. संजयकुमार गुप्ता, सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी पार्क ऑफ इंडिया  (पुणे) चे महासंचालक अरविंद कुमार, महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाचे महाव्यवस्थापक  प्रशांत गेडाम,  जितेंद्र देवकाते  उपस्थित होते.

नव उद्योजकीय स्टार्ट-अपला पाठिंबा देण्यासाठी आणि आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी अनुसूचित जातीतील ५ युवक-युवतींना महात्मा फुले महामंडळाच्या पीएम-अजय योजनेंतर्गत प्रत्येकी ५० हजार रुपयांप्रमाणे एकूण  २ लाख ५० हजार रूपयांचे अर्थसहाय्य यावेळी मंत्री श्री. गडकरी यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. मंत्री श्री. गडकरी यांनी महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या या उपक्रमाचे स्वागत केले आहे. नव उद्योजक घडण्यास यामुळे मदत होणार असून हजारो युवकांना प्रेरणा व रोजगार उपलब्ध होईल, असा आशावाद मंत्री श्री. गडकरी यांनी यावेळी व्यक्त केला.

महामंडळाचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक डॉ. अमोल शिंदे यांनी हे महामंडळ हे हॅपीनेस इंडेक्सवर काम करीत असल्याचे सांगितले. तसेच या महामंडळामार्फत उद्योग रोजगार मित्र हे कार्यक्रम राबविण्यात येत आहेत. राज्यात जिल्हा पातळीवर येणाऱ्या काळात महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ व महाप्रितच्या माध्यमातून व्यापक प्रमाणात उपक्रम राबविण्यात येणार आहेत. तसेच स्टार्टअपच्या माध्यमातून तरुणांच्या संकल्पनांना पाठबळ देऊन त्यांना आर्थिक सहाय्य देऊन, त्यांचा उद्योग व्यवसाय वाढीसाठी महामंडळ कटिबद्ध असल्याचे श्री. शिंदे यांनी यावेळी सांगितले.

०००