मुंबई शहर जिल्ह्यातील नवमतदार नोंदणी वाढविण्यासाठी विशेष मोहीम

0
7

मुंबई दि. 14 : मुंबई शहर जिल्ह्यात लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 18 ते 19 वर्ष वयोगटातील नवमतदार नोंदणी वाढविण्यासाठी विशेष जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे. अंतिम मतदार यादी प्रकाशित झाली आहे. मात्र, आगामी लोकसभा निवडणुकीसाठी नागरिकांना मतदार नोंदणीची संधी अजूनही उपलब्ध आहे. आजच मतदार यादीत आपले नाव तपासून, आपले नाव यादीत नसेल तर त्वरीत मतदार नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी संजय यादव यांनी केले.

मुंबई शहर जिल्हा कार्यालय, नियोजन भवन येथे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई शहर जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या मतदान जनजागृती अभियानासंदर्भात माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी स्वीप नोडल ऑफिसर फरोग मुकादम, मुंबई शहर उपजिल्हाधिकारी तथा उपजिल्हा निवडणूक अधिकारी श्यामसुंदर सुरवसे हे उपस्थित होते.

मतदार नोंदणी करुन सक्षम लोकशाही मध्ये सहभागी होण्यासाठी आगामी लोकसभा निवडणुकीसाठी मतदार यादीमध्ये नाव नोंदविण्याची संधी अजूनही आहे मतदारांनी मतदार यादीत आपले नाव तपासून घ्यावे, आणि आपले नाव नसेल तर मतदार नोंदणीसाठी voters.eci.gov.in / Voter Helpline Mobile App / मतदार मदत क्रमांक 1800221950 यावर संपर्क करावा असेही जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी संजय यादव यांनी सांगितले.

जिल्हा निवडणूक अधिकारी श्री. यादव म्हणाले की, भारत निवडणूक आयोगाने नवमतदार नोंदणीची दिलेली उद्दिष्टपूर्तीसाठी विशेष जनजागृती मोहिम राबवून अधिकाअधिक नवमतदार नोंदणी करुन घेण्यात येत आहे. या मतदार नोंदणी अभियानात 18 वर्ष पूर्ण झालेल्या तरुणांनी आपले नाव मतदार यादीत नोंदवावे, आगामी लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई शहर जिल्हा स्तरावर निवडणुकीच्या कामकाजासाठी समन्वयक अधिकारी (नोडल अधिकारी) म्हणून विविध अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. संबंधित अधिकाऱ्यांनी निवडणूक विषयक कामांना प्राधान्य दिले असून क्षेत्रिय अधिकारी, पोलीस क्षेत्रिय अधिकारी, मतदार नोंदणी अधिकारी, सहा.मतदार नोंदणी अधिकारी, केंद्रस्तरीय अधिकारी व कर्मचारी स्तरावर निवडणूक प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडण्यासाठी कामाचे नियोजन करण्यात येत आहे.

मुंबई शहर आणि उपनगर जिल्ह्यातील आगामी लोकसभा निवडणूक प्रक्रिया शांततामय, मुक्त, नि:पक्ष, सर्वसमावेशक, पारदर्शक आणि सुरळीत पार पाडण्यासाठी निवडणूकीच्या अनुषंगाने केंद्रीय उपनिवडणूक आयुक्त हिरदेश कुमार, मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे, मुंबई शहर जिल्हाधिकारी संजय यादव, मुंबई उपनगर जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर, वरिष्ठ पोलीस अधिकारी, धारावी – मतदार नोंदणी अधिकारी अश्विनी पाटील यांनी मुंबई शहर आणि उपनगर जिल्ह्यातील लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर धारावीसह अनेक मतदान केद्रांना भेटी देऊन कामकाज आढावा घेऊन चोख व्यवस्थापन व नियोजन करावे असे सांगून 18 ते 19 वयोगटातील नोंदणी न झालेल्या युवकांची मतदार नोंदणी वाढविण्यासाठी प्रयत्न करावे अशा सूचना दिल्या.

मुंबई महानगरपालिका आयुक्त  डॉ. इक्बाल चहल यांच्या अध्यक्षतेखाली विशेष मतदार नोंदणी मोहिमेसाठी मुंबई शहर, उपनगर जिल्हा व मनपा यांची संयुक्त बैठक

आगामी लोकसभा निवडणुका जाहीर होण्याआधी प्रत्येक मुंबईकराचा मताधिकार सुनिश्चित व्हावा या हेतूने, मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्हा आणि मुंबई महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने नवमतदार नोंदणीची विशेष मोहिम राबविण्यात येत आहे.

यामध्ये 18 वर्षावरील नागरीकांसाठी मतदार नोंदणीची विशेष मोहीम तसेच दिव्यांग मतदारापर्यंत पोहोचण्यासाठी मुंबई महानगरपालिकेकडे असलेल्या उपलब्ध माहितीच्या आधारे  या मतदारांपर्यंत पोहचण्याचे, अंथरुणावर खिळून असलेल्या नागरिकांची  आरोग्य विभागाकडील उपलब्ध  माहिती तपासून मतदार यादीतील नावांची खात्री करून घेणे, मुंबई शहर आणि उपनगर जिल्ह्यांतर्गत येणाऱ्या मुंबई विद्यापीठ, एसएनडीटी महिला विद्यापीठ, आरोग्य विद्यापीठ आणि होमी भाभा स्टेट विद्यापीठ, यांच्यासह मुंबई शहर आणि उपनगर भागातील खाजगी विद्यापीठांच्या कुलगुरुंशी समन्वय साधून बृहन्मुंबई महानगर पालिकेशी संलग्नीत सार्वजनिक आरोग्य विभागाच्या संलग्न आरोग्य सेविका, आशा सेविका, महिला स्वयंसहाय्यता गट, महिला बचत गट, स्वच्छ मुंबई प्रबोधन अभियान वस्ती पातळीवरील कार्यरत संस्था व त्यांचे स्वयंसेवक आणि नागरी सुविधा केंद्रांच्या माध्यमातून नवमतदारांची नोंदणी वाढविणे आणि स्वीप आराखडा निश्चित करणे याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

मुंबई शहर जिल्हा

लोकसभा निवडणूक-2024

* मुंबई शहर जिल्ह्यात 30-मुंबई दक्षिण मध्य, 31-मुंबई दक्षिण हे दोन लोकसभा मतदारसंघ आहेत.

* जिल्ह्यातील एकुण मतदार दि.13.02.2024 रोजी प्रसिध्द झालेल्या यादीनुसार 24 लाख 32 हजार 857 आहेत. यामध्ये पुरूष – 13 लाख 15 हजार 442, महिला-11 लाख 17 हजार 197 व तृतीयपंथी-218 आहेत.

००००

काशीबाई थोरात/विसंअ/

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here