मातंग समाजाच्या समस्यांबाबत सामाजिक न्याय विभाग सकारात्मक – सचिव सुमंत भांगे

0
6

मुंबई, ‍‍दि.18 : राज्यातील मातंग समाजाच्या समस्यांबाबत सामाजिक न्याय विभाग सकारात्मक असून या समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी आवश्यक कार्यवाही केली जाईल, अशी ग्वाही सामाजिक न्याय विभागाचे सचिव  सुमंत भांगे यांनी मातंग समाजाच्या शिष्टमंडळाला दिली.

मातंग क्रांती महामोर्चा शिष्टमंडळाने श्री. भांगे  यांची  नुकतीच भेट घेऊन विविध मागण्यांचे निवेदन दिले. त्यावेळी आयोजित बैठकीत श्री. भांगे यांनी शिष्टमंडळास आश्वासित केले.

मातंग क्रांती महामोर्चा शिष्टमंडळाने दिलेल्या निवेदनात  अण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्थेची निर्मिती करणे, जातीनिहाय जनगणना करणे, मातंग समाजाला वेगळे आठ टक्के आरक्षण देणे, अण्णाभाऊ साठे स्मारक (चिराग नगर) याची लवकर निर्मिती करणे, अण्णाभाऊ साठे विकास महामंडळातील कर्जासाठीच्या जाचक अटी कमी करणे, क्रांतिवीर लहुजी साळवे मातंग समाज अभ्यास आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी करणे, क्रांतीसम्राट डॉ. बाबासाहेब गोपले यांचे फोटो अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या सर्व कार्यालयात लावणे या मागण्याचा समावेश आहे.

यावेळी  बार्टीचे महासंचालक सुनील वारे , हिंदुस्थान ऍग्रो चे अध्यक्ष डॉ.ढोकणे पाटील, शिष्टमंडळातील सदस्य अशोक ससाणे, मोहनराव तुपसुंदर, सुदाम आवाडे,  राजेंद्र साठे, देवेंद्र खलसे, सुनिता तुपसुंदर, श्रावण नाटकर, शामराव सकट,  दिलीप कसबे, राजेश पवार, नानाभाऊ पाटोळे,  अनिल साठे, श्रीमती छबुबाई सूर्यवंशी आदी उपस्थित होते.

मातंग समाजाच्या संघटनेच्या वतीने आझाद मैदान मुंबई येथे दि. 18 जानेवारी 2024 रोजी समाजाच्या अनेक प्रलंबित मागण्यासाठी मोहनराव  कांबळे यांनी आमरण उपोषण केले होते. सामाजिक न्याय विभागाच्या विनंतीवरून त्यांनी उपोषण मागे घेतले होते. त्याअनुषंगाने शिष्टमंडळाची बैठक आयोजित करण्यात आली होती.

00000

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here