महासंस्कृती महोत्सवात भक्ती आणि कलेचा अनोखा संगम -पालकमंत्री चंद्रकांत पाटील

0
13

अमरावती, दि. २१ (जिमाका) : देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करीत आहे. त्यानिमित्ताने भारतीय संस्कृतीचे जतन करून स्थानिक कलाकारांना त्यांची कला सादर करण्याची संधी देण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने महासंस्कृती महोत्सवाचे आयोजन राज्यभर करण्यात येत आहे. येथील स्थानिक कलाकारांना महोत्सवाच्या माध्यमातून आदिवासी नृत्य, कोरकू, गोंधळ, भारुड, कला, संस्‍कृती सादर करण्यासाठी व्यासपीठ मिळाले आहे. भक्ती आणि कलेचा अनोखा संगम महासंस्कृती महोत्सवात बघायला मिळत आहे, असे प्रतिपादन उच्च व तंत्र शिक्षण तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत  पाटील यांनी आज येथे केले.

सायन्स स्कोर मैदान येथे आयोजित महासंस्कृती महोत्सवाला पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज भेट दिली, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पार्श्वगायिका बेला शेंडे यांच्या प्रमुख उपस्थितीसह खासदार डॉ. अनिल बोंडे, खासदार नवनीत राणा, आमदार प्रवीण पोटे-पाटील, माजी महापौर चेतन गावंडे, तुषार भारतीय, निवेदिता चौधरी, जिल्हाधिकारी सौरभ कटियार, मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता मोहपात्रा, मनपा आयुक्त देविदास पवार, अपर जिल्हाधिकारी सुरज वाघमारे, उपविभागीय अधिकारी अनिल भटकर आदी मान्यवर उपस्थित होते.

पालकमंत्री श्री. पाटील म्हणाले की, महासंस्कृती महोत्सवाच्या माध्यमातून मनाची भूक भागविण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. सांस्कृतिक महोत्सवाच्या माध्यमातून स्थानिक कलाकारांना आपली कला दाखविण्याची संधी मिळाली आहे. यामुळे या कलाकांराना प्रोत्साहन मिळत असून त्यांच्यासाठी संधीची नवीन कवाडे खुली होत आहे.

पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग व जिल्हाधिकारी कार्यालय अमरावती यांच्या सयुक्त विद्यमाने आयोजित महासंस्कृती महोत्सवाच्या चौथ्या दिवशी कलाकारांना शुभेच्छा देण्यासाठी पालकमंत्री श्री. पाटील उपस्थित होते. श्री. बुलीदान राठी मूकबधिर विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेला कलाविष्कार बघून मी खरोखर अंर्तमुख झालो. देवाने त्यांना एखादा अवयव कमी दिला असेल, मात्र कलाविष्कार सादर करताना त्यांनी आपल्यातील कला जिवंत ठेवून खऱ्या अर्थाने महासंस्कृती महोत्सवाला मोठे केल्याची प्रतिक्रिया श्री. पाटील यांनी दिली. यावेळी पालकमंत्री यांनी प्रत्यक्ष रंगमंचावर जाऊन मूकबधिर विद्यार्थ्यांचे सांकेतिक भाषेत कौतुक केले आणि त्यांच्या शिक्षकास स्वतःच्या हातावरील घड्याळ बांधून त्यांचेही अभिनंदन केले. शिवाय मूकबधिर विद्यालयाला नियोजन समितीमधून निधी उपलब्ध करुन देण्यात येईल. तसेच लोकसहभागातूनही स्वतः पाच लक्ष रुपये देण्याचे आश्वासनही श्री. पाटील यांनी यावेळी दिले.

या महासंस्कृती महोत्सवात पार्श्वगायिका बेला शेंडे आणि आनंदी जोशी यांच्या आवाजातील मराठी गीतांनी अमरावतीकर रसिक श्रोत्यांना भुरळ पाडली. मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध  गीतांचा नजराणा यावेळी सादर करण्यात आला. अमरावतीकर रसिकांनीही त्याला उत्तम प्रतिसाद दिला.

सिंघम आदिवासी नृत्य ठरले आकर्षण

महासंस्कृती महोत्सवात स्थानिक कलावंतांनी सहभाग घेऊन दमदार कलाविष्कार सादर केले. यामध्ये सिंघम आणि आदिवासी नृत्य सर्वांचे आकर्षण ठरले. श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या वतीने विद्यार्थ्यांनी सादर केलेले मल्लखांब प्रात्यक्षिक दर्जेदार ठरले. स्थानिक कलावंतांनी एकापेक्षा एक सरस कलाविष्कार सादर करून अमरावतीकर प्रेक्षकांचे मनोरंजन केले.

०००

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here