भारताच्या सांस्कृतिक योगदानात गायत्री परिवाराचे मोठे योगदान – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
7

रायगड दि. २२ (जिमाका): भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी विकसित भारताचे स्वप्न पाहिले आहे. भारताच्या सांस्कृतिक योगदानामध्ये गायत्री परिवाराचे सर्वाधिक योगदान असेल, असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

अखिल विश्व गायत्री परिवाराच्या वतीने खारघरमध्ये पाच दिवशीय अश्वमेध महायज्ञाचे आयोजन करण्यात आले असून आज दुसऱ्या दिवशी उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी उपस्थित राहून देवावाहन, देवदर्शन घेतले. तसेच महायज्ञात सहभागी होऊन यज्ञ अग्नीमध्ये आहुती दिली.

यावेळी खासदार जे. पी. नड्डा, डॉ. मल्लिका नड्डा, गायत्री परिवाराचे संस्थापक शैलबाळा पंड्या,  डॉ.चिन्मय पंड्या, सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार, कौशल्य व रोजगार मंत्री मंगल प्रभात लोढा, आमदार सर्वश्री चंद्रशेखर बावनकुळे, आशिष शेलार, प्रविण दरेकर,  मंदा म्हात्रे, प्रशांत ठाकूर, जिल्हाधिकारी किशन जावळे, गीतकार समीर, गायक शंकर महादेवन, संगीत आणि गायक हिमेश रेशमिया आणि अभिनेता सुनील लहिरी यासह इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महाराष्ट्र ही वीरांची, संतांची तसेच ज्योतिर्लिंग आणि शक्तिपीठ असलेली भूमी आहे. या भूमीत वैश्विक शांती साठी महायज्ञ आयोजित करण्यात आला आहे, यासाठी गायत्री परिवाराचे आभार मानून  उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की,  गायत्री परिवाराने यज्ञ परंपरेला वैश्विक महत्त्व प्राप्त करून दिले आहे. ही सनातन, यज्ञ संस्कृती विज्ञानाधिष्ठीत असून विश्व शांती तसेच सदाचारी वर्तनासाठी जागतिक पातळीवर पोहोचविण्याचे काम गायत्री परिवार करीत आहे.

हम बदलेंगे तो देश बदलेगा हा आपला मंत्र आहे. गायत्री परिवाराने नशामुक्ततेसाठी विशेष अभियान हाती घेतले आहे. विश्व कल्याणसाठी गायत्री परिवाराचे मोठे योगदान असल्याचेही उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

या अश्वमेध यज्ञात सहभागी सर्वानी यावेळी पर्यावरण संरक्षण, महिला सबलीकरण, अंमली पदार्थ मुक्त जग, मानव कल्याण, सहकार्य-संघटन आणि मजबूत राष्ट्र उभारणीसाठी संकल्प केला.

०००

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here