विषबाधा झालेल्यांवर उपचार करणाऱ्या यंत्रणेची आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांच्याकडून प्रशंसा

0
9

मुंबई , दि. २२ : बुलढाणा जिल्हयातील लोणार तालुक्यातील सोमठाणा व खापरखेड येथे अखंड हरिनाम सप्ताहाच्या कार्यक्रमात जेवणातून २०८ जणांना विषबाधा झाल्याची घटना समोर आली होती.  विषबाधा झालेल्या सर्वांवर वेळेत उपचार करून त्यांना घरी सोडून देण्यात आले आहे. यामध्ये काम करणारे शासकीय डॉक्टर, कर्मचारी व रूग्णवाहिका चालक अशा २७ जणांना, ७ खासगी डॉक्टर यांच्या कार्याची दखल आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी घेतली असून रूग्ण कल्याण समिती, बिबी यांना १ लाख रूपयांची आर्थिक मदतही केली आहे.  आपल्या स्वाक्षरीचे प्रशंसा पत्र देवून यांच्या कार्याचा गौरव आरेाग्यमंत्री यांनी केला आहे. मंत्री डॉ. सावंत यांनी पुन्हा एकदा आपल्या संवदेनशीलपणाचा परिचय देत आपत्कालीन आरोग्य परिस्थितीत काम करणाऱ्या डॉक्टर, आरोग्य कर्मचारी यांच्या पाठीवर शाब्बासकीची थाप दिली आहे.

या घटनेची माहिती मिळताच ग्रामीण रूग्णालय, बिबी  ता. लोणार येथील  डॉक्टर्स, नर्सेस आणि रुग्णवाहिका प्रत्यक्ष घटनास्थळावर पाठवण्यात आल्या. त्यामुळे तात्काळ रुग्णांना उपचार देणे शक्य झाले. त्यामुळे कुठलीही जीवितहानी झाली नाही. यामध्ये उल्लेखनीय काम करणारे ग्रामीण रूग्णालय बिबी, बुलढाणा स्त्री रूग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र शिवनी ता. लोणार, सुलतानपूर ता. लोणार, रायगांव ता. मेहकर, मलकापूर पांग्रा ता. सिं. राजा, आरोग्य सेवक, आरोग्य सहायिका, रूग्णवाहिका चालक, समुदाय आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, खाजगी डॉक्टर्स, तालुका आरोग्य अधिकारी यांना मंत्री डॉ. सावंत यांच्या स्वाक्षरीचे प्रशंसा पत्र देण्यात आले आहे. डॉक्टर्स, आरोग्य कर्मचारी यांच्या चेहऱ्यावर आरोग्य मंत्र्यांनी केलेल्या गौरवामुळे निश्चितच समाधान आहे.

विषबाधा झाल्याने उलटी, जुलाब होऊन रुग्णांच्या शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होऊन जिवितास धोका निर्माण होण्याची शक्यता असते. त्यामुळे त्यांच्यावर परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन जागेवरच उपचार करण्यात आले. आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी  शर्तीचे प्रयत्न करून सर्वांचे प्राण वाचविले. आरोग्य कर्मचाऱ्यांनी व आरोग्य विभागातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केलेल्या अथक प्रयत्नांमुळे कुठलीही जीवित हानी झाली नाही, याचे परिसरातील सर्व ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.

०००

निलेश तायडे/विसंअ/

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here