मुंबई, दि. २२ : राज्यातील बालमृत्यू कमी करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत सातत्याने प्रयत्न करण्यात येत आहे. या प्रयत्नांना यश आल्याचे गेल्या काही वर्षाच्या केंद्र सरकारच्या अहवालावरून स्पष्ट झाले आहे. केंद्र सरकारच्या २०१८ च्या एसआरएस अहवालानुसार महाराष्ट्राचा अर्भकमृत्यू दर हा प्रति १००० जिवंत जन्मामागे १९ असा होता, त्यात घट होऊन सन २०२० च्या एसआरएस अहवालानुसार तो १६ झाला आहे.
तसेच सन २०२० च्या एसआरएस अहवालानुसार राज्याचा नवजात मृत्यू दर हा ११ असून महाराष्ट्राने शाश्वत विकास ध्येयाचे (एसडीजी २०३०) नवजात मृत्यू दर १२ पेक्षा कमी करण्याचे लक्ष्य गाठले आहे.
आरोग्य मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. त्यांनी नियमित यासाठी बैठका घेतल्या.
राज्यातील जिल्हा रुग्णालय, स्त्री रुग्णालय व काही उपजिल्हा रुग्णालयांत शिशु अती दक्षता विभागाची (एसएनसीयू)ची स्थापना करण्यात आलेली आहे. राज्यात एकूण ५३ एसएनसीयू कक्ष स्थापन करण्यात आले आहेत. या ठिकाणी बाळ जन्मल्यानंतर बाळाचे वजन कमी असल्यास, काविळ झाली असल्यास किंवा त्याला इतर कोणताही त्रास असल्यास बाळाला एसएनसीयू कक्षामध्ये दाखल करुन उपचार केले जातात. एसएनसीयुमध्ये किमान १२ ते १६ खाटा असून हा कक्ष रेडियंट वॉर्मर, फोटोथेरपी युनिट, इन्प्युजन पंप, मॉनिटर्स, नॉन इनवेसिव्ह व्हेंटीलेशन (सीपीएपी) यासारख्या उपकरणांनी सुसज्ज आहे. राज्यात माहे एप्रिल २०२३ ते जानेवारी २०२४ पर्यंत एकूण ५६ हजार ४६७ बालकांना एसएनएसीयुमध्ये उपचार करण्यात आले. त्यांपैकी १५०० ग्रॅम पेक्षा कमी वजनाच्या ५ हजार ४५९ बालकांवर उपचार करण्यात आले.
राज्यातील ग्रामीण रुग्णालय व उपजिल्हा रुग्णालय येथे नवजात स्थिरीकरण युनिट (एनबीएसयू) कार्यरत आहेत. राज्यात एकूण २०० एनबीएसयु असून येथे सौम्य आजार असलेल्या नवजात बालकांवर उपचार केले जातात. या कक्षामार्फत रेडियंट वॉर्मर, फोटोथेरपी युनिट, पल्स ऑक्सीमीटर, कांगारु मदर केअर, स्तनपानाची लवकर सुरुवात, ऑक्सिजन सलाईन, आदी सेवा देण्यात येतात. राज्यात माहे एप्रिल २०२३ ते जानेवारी २०२४ पर्यंत एकूण २४ हजार ६३ बालकांवर उपचार करण्यात आले.
माँ (मदर एब्सुल्युट अफेक्शन) कार्यक्रम
स्तनपानाविषयी मातेला, वडिलांना तसेच कुटुंबियांना योग्य माहिती पुरविण्यासाठी तसेच स्तनपान व शिशुपोषणास सक्षम असे वातावरण तयार करण्यासाठीचा हा एक महत्वाकांक्षी कार्यक्रम आहे. या कार्यक्रमा अंतर्गत प्रचार व प्रसिध्दी, स्तनदा व गरोदर मातांसाठी आशांमार्फत घेण्यात येणाऱ्या माता बैठका, आरोग्य कर्मचाऱ्यांना स्तनपान व शिशूपोषणाचे प्रशिक्षण, सनियंत्रण व मूल्यमापन, सर्व आरोग्य संस्थांचे शिशू मैत्रीकरण इ. उपक्रम राबविले जातात. यामध्ये ६ महिन्यापर्यंत निव्वळ स्तनपान व ६ महिन्यानंतर पूरक आहार देण्याबाबत समुपदेशन करण्यात येते. माहे एप्रिल २०२३ ते डिसेंबर २०२३ पर्यंत एकूण १ लाख ७२ हजार ९४१ माता बैठका झाल्या असून यामध्ये १३लाख ७४ हजार ५१५ मातांना समुपदेशन करण्यात आले.
ॲनिमिया मुक्त भारत कार्यक्रम
राज्यातील लहान बालके, किशोरवयीन मुले व मुली, गर्भवती व स्तनदा मातांमधील रक्तक्षयाचे प्रमाण कमी करण्यासाठी पोषण अभियानांतर्गत ॲनिमिया मुक्त भारत हा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. त्या अनुषंगाने ६ महिने ते ५९ महिने व ५ ते ९ वर्ष या वयोगटातील बालकांना, १० ते १९ वर्षे वयोगटातील किशोरवयीन मुला-मुलींना, गर्भवती व स्तनदा माता व प्रजननक्षम वयोगटातील स्त्रिया यांना लोह व फॅालिक ऑसिड (IFA) या औषधाची प्रतिबंधात्मक पूरक मात्रा देण्यात येते. तसेच रक्तक्षय असलेल्या लाभार्थ्यांना आवश्यक उपचार व संदर्भ सेवा देण्यात येते.
गृहस्तरावर नवजात बालकांची काळजी
राज्यातील नवजात शिशु व अर्भक मृत्यू कमी करण्यासाठी हा कार्यक्रम राबविण्यात येतो. या कार्यक्रमांतर्गत आशा सेविकांना १ ते ४ टप्याचे प्रशिक्षण देण्यात येते. आशांव्दारे एच.बी.एन.सी. प्रशिक्षणाच्या आधारावर नवजात बालकांना ४२ दिवसात सहा ते सात गृहभेटी देण्यात येतात. आरोग्य संस्थेत प्रसूती झालेल्या माता व नवजात बालकांस आशा मार्फत ६ गृहभेटी या जन्मानंतर ३,७,१४,२१,२८ व ४२ व्या दिवशी देण्यात येतात.
तसेच घरी प्रसूती झालेल्या माता व नवजात बालकांस आशामार्फत ७ गृहभेटी या १,३,७,१४,२१,२८ व ४२ व्या दिवशी देण्यात येतात. या वेळापत्रकाप्रमाणे गृहभेटी दिल्यास प्रत्येक आशाला २५० रुपये इतके मानधन अदा करण्यात येते. प्रसूतीच्या ४२ दिवसांपर्यंत आई आणि नवजात बालक दोघेही सुरक्षित राहतील, याची खात्री करण्यात येते. गृहभेटी दरम्यान जंतुसंसर्ग, न्युमोनिया, हायपोथर्मिया, ताप, स्तनपान समस्या, अतिसार, कमी दिवसाची बालके, कमी वजनाची बालके, डोळयाने दिसणारे जन्मजात व्यंग अशी बालके आढळल्यास नवजात शिशुंना जवळच्या शासकिय आरोग्य संस्थेत संदर्भित करण्यात येते. बालकांच्या तपासणी दरम्यान आढळलेल्या बाबींची नोंद करण्याकरिता आशांना एचबीएनसी बुकलेट उपलब्ध करुन दिले आहे. गृहभेटी दरम्यान पोषण, आरोग्य, प्रारंभिक बालपणातील विकास आणि वैयक्तिक व परिसर स्वच्छता या ४ प्रमुख बाबींवर भर देण्यात येतो.
०००
निलेश तायडे/विसंअ/