महासंस्कृती महोत्सवातून राज्याच्या संस्कृतीचे दर्शन घडणार – पालकमंत्री दीपक केसरकर

0
4

मुंबई, दि. २२ : महासंस्कृती महोत्सवामध्ये मर्दानी खेळ, शिववंदनासह राज्याच्या विविध संस्कृतींचे दर्शन घडणार असून मुंबई शहर जिल्ह्यातील नागरिकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन मुंबई शहरचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी केले.

शहीद भगतसिंग मैदान, अभ्युदय नगर, काळाचौकी येथे पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग, महाराष्ट्र शासन व जिल्हाधिकारी कार्यालय, मुंबई शहर यांच्या संयुक्त विद्यमाने  महासंस्कृती महोत्सवाचे २२ ते २६ फेब्रुवारी या कालावधीत आयोजन केले आहे. या कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी मंत्री दीपक केसरकर  बोलत होते.

या कार्यक्रमास आमदार कालिदास कोळंबकर, मुंबई शहरचे जिल्हाधिकारी संजय यादव,अतिरिक्त जिल्हाधिकारी रवींद्र कटकधोंड, निवासी उपजिल्हाधिकारी जयराज कारभारी, सांस्कृतिक कार्य विभागाचे सहायक आयुक्त महेश पाटील यावेळी उपस्थित होते.

मंत्री श्री.केसरकर म्हणाले की, मुंबई शहराच्या विकासासाठी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. जिल्हा नियोजन व विकास समितीच्या माध्यमातून अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येत आहेत. मुंबईतील पोलीस वसाहतींचे काम लवकरच पूर्ण करण्यात येणार आहे. महिला बचत गटांच्या हाताला काम मिळावे यासाठी लवकरच एक केंद्र सुरू करणार आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी  गिरगाव येथे पहिले काळजी केंद्र सुरू होणार आहे. मुंबई जिल्हाधिकारी कार्यालय येथे दर बुधवारी आणि मुंबई महापालिकेत देखील नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करत असतो असे मंत्री श्री.केसरकर म्हणाले.

उद्घाटन समारंभानंतर ‘जल्लोष’ या कार्यक्रमात सुशांत शेलार, पूजा सावंत, श्वेता खरात जुई बेंडखळे, गौरी कुलकर्णी, विश्वजीत बोरवणकर, आनंदी जोशी, कमलाकर सातपुते, अंशुमन विचारे, कौस्तुभ दिवाण, पूर्वी भावे यांचा सहभाग होता.

महासंस्कृती महोत्सव कार्यक्रमात २३ ते २६ फेब्रुवारी पर्यंत विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल आहे. प्रदर्शन दालनामध्ये शिवकालीन शस्त्रे, नाणी व हस्तलिखीते, शिवसंस्कार काव्य दालन, स्वराज्य ते साम्राज्य आर्ट गॅलरीचा समावेश करण्यात आला आहे. तसेच रंगमंचावरील सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये महाराष्ट्राची संस्कृती दर्शवणारे महाराष्ट्राची लोकधारा व लोकनृत्य, शिववंदन, मराठी बाणा, जल्लोष, सप्तरंग-हास्य व नृत्य गाण्यांचा बहारदार नजराणा, दशावतार कार्यक्रमांचा समावेश असणार आहे. तसेच मर्दानी खेळामध्ये मल्लखांब, लेझीम, पारंपारिक नृत्य कला प्रकार, देशभक्तीपर गीते, इ. चा समावेश असणार आहे. या कार्यक्रमामध्ये  स्थानिक कलावंताच्या कलेस वाव मिळणार आहे.

०००

संध्या गरवारे/विसंअ/

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here