पोवई नाका (ता. सातारा) येथे लोकनेते बाळासाहेब देसाई आयलँड विकसित होणार!

मुंबई, गुरुवार, २२ फेब्रुवारी २०२४  :- सातारा शहरातील नगर परिषद हद्दीतील पोवई नाका परिसरात लोकनेते स्व. बाळासाहेब देसाई यांच्या स्मरणार्थ आयलँड विकसित करण्याचा निर्णय झाला असून त्याकरिता १ कोटी ३७ लाख रुपये निधी उपलब्ध करून देण्यास गुरुवारी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी मान्यता दिली आहे. बुधवारी, २१ फेब्रुवारी रोजी झालेल्या बैठकीत पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिलेल्या सूचनांनुसार अवघ्या एक दिवसात जिल्हा प्रशासनाने आयलँड प्रस्तावाची कार्यवाही पूर्ण केली. गुरुवारी सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी निधी उपलब्ध करून दिल्याने आयलँड विकसित होण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे.
साताऱ्याचे सुपुत्र लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या स्मरणार्थ पोवई नाका येथे आयलँड विकसित करण्याची मागणी साताऱ्यातील नागरिकांकडून गेल्या काही काळापासून होत होती. त्या अनुषंगाने पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी बुधवारी सह्याद्री अतिथीगृह येथे जिल्हा प्रशासन व संबंधित विभागांची आढावा बैठक घेऊन आवश्यक त्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने आयलँड प्रस्तावाची कार्यवाही अवघ्या एका दिवसात पूर्ण केली. गुरुवारी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आणि पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या उपस्थितीत सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या विशेष बैठकीत सदर प्रस्ताव मांडण्यात आला. मुख्यमंत्र्यांनी पोवई नाका येथे आयलँड होण्याच्या दृष्टीने सकारात्मक भूमिका घेत त्याकरिता निधी उपलब्ध करून देण्यास मान्यता दिली.
त्यानुसार नगर विकास विभागाच्या निधीतून १ कोटी ३७ लाख रुपये निधी आयलँड विकसित करण्यास उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यामुळे लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या स्मरणार्थ शहराच्या सौंदर्यात भर घालणारे ट्रॅफिक आयलँड पोवई नाका येथे लवकरच प्रत्यक्षात येणार आहे. पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे आणि मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या सकारात्मक सहकार्यामुळे आयलँड विकसित होण्याचा मार्ग मोकळा झाल्याने सातारकर नागरिकांमध्ये आनंदाची भावना आहे.
लोकनेते स्व. बाळासाहेब देसाई यांच्या स्मरणार्थ पोवई नाका येथे आयलँड व्हावे, ही साताऱ्याच्या जनतेची मागणी होती. ती आता पूर्ण होईल, याचा आनंद आहे. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी सातारकर नागरिकांच्या मागणीचा संवेदनशीलपणे विचार करून आयलँडसाठी निधी उपलब्ध करून दिला, याबद्दल त्यांना मन:पूर्वक धन्यवाद व्यक्त करतो. लवकरच लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या पुतळ्यासह परिपूर्ण ट्रॅफिक आयलँड पोवई नाका येथे उभारण्यात येईल. तसेच साताऱ्याच्या सर्वांगीण विकासासाठी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही प्रयत्नशील आहोत, असा विश्वास यानिमित्ताने व्यक्त करतो. – पालकमंत्री शंभूराज देसाई