शासकीय वसतिगृहासाठी इमारत भाड्याने देऊ इच्छिणाऱ्यांनी संपर्क साधण्याचे आवाहन

मुंबई, दि.२३ : मुंबई शहर जिल्ह्यात इतर मागास वर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्ग या प्रवर्गातील विद्यार्थ्यांकरीता १०० मुलींची क्षमता आणि १०० मुलांची क्षमता असलेले वसतिगृह सुरु करण्यात येणार आहेत. मुंबई शहर जिल्ह्यात दहा हजार चौ. फुट स्वतंत्र क्षेत्रफळाची जागा असलेल्या शासकीय वसतिगृहासाठी इमारत भाड्याने देऊ इच्छिणाऱ्या इमारत मालकांनी संपर्क साधण्याचे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सहायक संचालक मुंबई शहर यांनी केले आहे.

मुंबई शहर जिल्ह्यातील स्वतंत्र मुला-मुलींच्या वसतिगृहाकरीता दहा हजार चौ. फुट स्वतंत्र क्षेत्रफळाची जागा असलेल्या खासगी इमारतीच्या मालकांना शासनाच्या प्रचलित नियमांनुसार सार्वजनिक बांधकाम विभाग भाडे निश्चित करुन देईल. त्या भाडेकरारावर देण्यास तयार असलेल्या  मुंबई शहर जिल्ह्यातील खासगी इमारतीच्या मालकांनी सहायक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण विभाग, मुंबई शहर, प्रशासकीय इमारत, भाग-१, चौथा मजला, आर. सी. मार्ग, चेंबूर, मुंबई ४०००७१  या कार्यालयाशी  दि. १ मार्च २०२४ पर्यंत संपर्क साधावा.

०००

शैलजा पाटील/विसंअ