आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी सर्वंकष आराखडा तयार करावा – पालकमंत्री दादाजी भुसे

0
6

नाशिक, दिनांक 23 फेब्रुवारी, 2024 (जि.मा.का. वृत्तसेवा) : आगामी सिंहस्थ कुंभमेळा सन २०२६-२७ सुरळीतपणे पार पाडण्यासाठी व भाविकांना अधिकाधिक सोयी सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने सर्वंकष आराखडा तयार करावा, असे निर्देश पालकमंत्री दादाजी भुसे यांनी आज येथे दिले.

आगामी सिंहस्थ कुंभमेळा सन २०२६-२७ पूर्वतयारी बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. जिल्हा नियोजन सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय येथे आयोजित या बैठकीस बैठकीस  विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, खासदार हेमंत गोडसे, आमदार हिरामण खोसकर आणि नितीन पवार, जिल्हाधिकारी जलज शर्मा, महानगरपालिका आयुक्त डॉ. अशोक करंजकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, जिल्हा पोलिस अधीक्षक विक्रम देशमाने, जलसंपदा विभागाच्या कार्यकारी अभियंता सोनल शहाणे आदि मान्यवर उपस्थित होते.

पालकमंत्री दादाजी भुसे म्हणाले, नाशिक व त्र्यंबकेश्वर शहरात दर १२ वर्षांनी सिंहस्थ कुंभमेळा आयोजित करण्यात येतो. या सिंहस्थ कुंभमेळा नियोजनासाठी राज्य शासनाने निर्गमित केलेल्या सर्व शासन निर्णयाचे अवलोकन करावे. यासाठी शिखर, उच्चाधिकार व जिल्हा स्तरावर विविध समित्या गठित करण्यात येणार आहेत. शासन निर्णयाचे अवलोकन करण्याबरोबरच सिंहस्थ कुंभ मेळा आयोजनासंदर्भातील संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांनी मागील कुंभ मेळा स्थळी प्रत्यक्ष भेटी देऊन संबंधितांचे अनुभव माहिती करून घ्यावेत. तसेच, आराखडा अंतिम करण्यापूर्वी सामान्य नागरिकांच्या सूचना मागविण्यात याव्यात, त्यासाठी ॲप विकसित करावे, असे ते म्हणाले

पालकमंत्री दादाजी भुसे म्हणाले, आगामी सिंहस्थ कुंभमेळा सन २०२६-२७ च्या नियोजनाच्या अनुषंगाने साधुसंत, महंत, भाविक यांना स्वच्छ पेयजल, पुरेशी वीजव्यवस्था, आरोग्य सुविधा, सुरक्षाव्यवस्था आदि सोयीसुविधांचा बारकाईने विचार करावा. यासंदर्भात संकेतस्थळ विकसित करावे. आर्किटेक्ट, इंजिनिअर्स, सेवाभावी संस्था आदिंच्या बैठका घेऊन त्यांच्या योग्य सूचना विचारात घ्याव्यात. त्र्यंबकेश्वरच्या आराखड्यासाठी स्वतंत्र बैठक घेऊ, असे ते म्हणाले.
कुंभमेळ्याच्या निमित्ताने विविध शक्तीस्थळे आणि श्रद्धास्थाने येथील सोयीसुविधांचाही विकास होईल, यादृष्टीने नियोजन करावे, असे सांगून  पालकमंत्री दादाजी भुसे म्हणाले, आगामी सिंहस्थ कुंभमेळा सन २०२६-२७ च्या औचित्याने शहर, जिल्ह्याच्या विकासाची संधी मिळाली असल्याचा विचार आराखडा तयार करताना ठेवावा. हा विकास पुढील पिढीसाठी शाश्वत ठरेल. यातून देशात, राज्यात जिल्ह्याचे नाव उज्ज्वल होईल,  आराखडा तयार करताना चौकटीबाहेर सृजनात्मक काम करावे, असे त्यांनी सूचित केले.

यावेळी नरहरी झिरवळ आणि खासदार हेमंत गोडसे, आमदार हिरामण खोसकर यांनी मौलिक सूचना केल्या.
महानगरपालिकेच्या व त्र्यंबकेश्वर नगरपरिषदेच्या वतीने आराखड्याचे सादरीकरण करण्यात आले. यामध्ये कुंभमेळा इतिहास, मागील कुंभमेळा गोषवारा, साधुग्राम क्षेत्र, मनुष्यबळ, आव्हाने, गर्दी व्यवस्थापन, पाणीपुरवठा, सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन, वैद्यकीय सुविधा, रस्ते, घाटांचा विकास, सिंहस्थ सुविधा केंद्र, दिशादर्शक फलक, आणिबाणी घटना पूर्वतयारी आदिंचा आढावा घेण्यात आला.

प्रारंभी दिवंगत नेते मनोहर जोशी यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. नाशिक जिल्हा परिषद अंतर्गत अनुकंपा तत्त्वावर नोकरी प्राप्त उमेदवारांना मान्यवरांच्या हस्ते प्रातिनिधीक स्वरूपात नियुक्तीपत्र वितरित करण्यात आले. तसेच जिल्हा परिषद अंतर्गत प्राथमिक शिक्षक, पदवीधर शिक्षक यांना प्रातिनिधीक स्वरूपात निवडश्रेणी लाभ प्रदान करण्यात आला.
00000

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here