उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते ऊसतोड कामगारांच्या वारसदारांना धनादेशाचे वाटप

पुणे, दि.२४: लोकनेते गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाच्यावतीने जिल्ह्यातील मृत्यू झालेल्या दोन ऊसतोड कामगारांच्या वारसांना देण्यात येणाऱ्या प्रत्येकी ५ लाख रुपयांच्या धनादेशाचे वाटप उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. याबद्दल वारसदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आभार मानले.

यावेळी आमदार चेतन तुपे, विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार,  जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण,लोकनेते गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. दिनेश डोके, व्यवस्थापक बाळासाहेब सोळंकी, समाज कल्याण सहायक आयुक्त विशाल लोंढे, बबन माने आदी उपस्थित होते.

ऊसतोड कामगार, वाहतूक कामगार व मुकादम यांचा अपघाती मृत्यू झाल्यास अशा व्यक्तीचे कुटुंबिय, वारसदारांना महामंडळाच्यावतीने ५ लाख रुपयांचे आर्थिक सहाय्य करण्यात येते. शासनाने बीड जिल्ह्यातील ३१, जालना ३, धाराशिव-७, अहमदनगर २३ आणि पुणे ३ असे एकूण ६७ प्रस्तावाकरीता ३ कोटी ३५ लाख रुपये संबंधित जिल्ह्यांना वर्ग केले आहे.

पुणे जिल्ह्यातील स्व. यादव क्षीरसागर आणि स्व. उमेश चव्हाण या ऊसतोड कामगाराचा अपघाती मृत्यू झाला होता, त्यांच्या वारसदार शिवकन्या क्षीरसागर आणि सुशीला चव्हाण यांना धनादेश सुपूर्द करण्यात आले. उर्वरित एका वारसदाराला लाभ देण्याची कार्यवाही सुरू असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

००००