वंचित घटकांच्या उन्नतीसाठी अधिकारांचा वापर करा – मुख्य निवडणूक आयुक्त श्रीकांत देशपांडे

0
10

सातारा दिनांक 26 (जिमाका) :  दीनदुबळ्या वंचित घटकांच्या उन्नतीसाठी आपल्या अधिकारांचा वापर करा. त्यांच्या विकासासाठी कार्य करा. संवेदनशील रहा लवचिक रहा. भटके विमुक्त समाज हे वंचितातील वंचित घटक आहेत. त्यांची दुःख जाणून घ्या, असे आवाहन अप्पर मुख्य सचिव तथा महाराष्ट्र राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयात भटके विमुक्तांसंदर्भात जिल्ह्यात काम करणाऱ्या संस्थांसोबत त्यांनी आढावा बैठक घेतली. यामध्ये ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी , अप्पर जिल्हाधिकारी जीवन गलांडे , उपमुख्य निवडणूक अधिकारी भगवान कांबळे, सर्व उपविभागीय अधिकारी, भटके विमुक्तांसंदर्भात काम करणाऱ्या संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य श्रीकांत देशपांडे म्हणाले, गाव कुसाबाहेर , पालांमध्ये राहणारा , शिक्षणाचे अत्यल्प प्रमाण असणारा असा हा वंचित समाज असून त्यांच्याकडे कोणती शासकीय कागदपत्रे उपलब्ध असण्याची शक्यता नाही. अशा समाजाची खरी प्रगती शिक्षणामुळेच होऊ शकते. शिक्षणाची कवाडे त्यांच्यासाठी उघडी झाली पाहिजेत. त्यांच्याकडे जातीचे दाखले असणे आवश्यक आहे.  गृहभेटीद्वारे शहानिशा करून त्यांना जातीचे दाखले देण्याबाबत कायद्यात तरतूद आहे. या तरतुदींचा प्रभावी वापर करून भटके विमुक्त समाजातील नागरिकांना कायदेशीर लाभ देण्याबाबत प्रशासकीय यंत्रणेने अत्यंत संवेदनशील व लवचिक राहावे. या समाजातील लोकांना मतदान ओळखपत्र देताना स्वयंघोषणापत्र पुरेसे आहे. या सर्व लोकांना मतदान ओळखपत्र द्या, रेशन कार्ड द्या, जातीचे दाखले द्या, शासनाच्या विविध योजनांचा लाभ देऊन त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणा.
यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी भटक्या विमुक्त समाजातील लोकांपर्यंत पाणी, रेशनकार्ड , जातीचे दाखले, उज्वला, उजाला यासारख्या योजना जिल्हा प्रशासन प्रभावीपणे पोहोचवत आहे. यातील प्रत्येक कुटुंबाला त्याचे हक्काचे घरकुल मिळावे यासाठी आवश्यक पावले उचलण्यात येत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here