विधानपरिषदेतील निवृत्त सदस्यांना निरोप

मुंबई, दि. 14 : विधान परिषद हे वरिष्ठ सभागृह असून या सभागृहाला समृद्ध परंपरा लाभली आहे. आज अनेक क्षेत्रातील दिग्गज हे या सभागृहातून निवृत्त होत आहेत त्यांना शुभेच्छा देतो. या सर्व निवृत्त होणाऱ्या सदस्यांनी सभागृहाच्या मर्यादा सांभाळल्या, त्यांच्या योगदानाची महाराष्ट्राच्या इतिहासाने नोंद घेतली आहे, अशा भावना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केल्या. विधानपरिषदेतील 18 निवृत्त सदस्यांना निरोप देण्यात आला त्यावेळी ते बोलत होते.

त्यामध्ये पृथ्वीराज देशमुख, हरिसिंग राठोड, हेमंत टकले, आनंद ठाकूर, किरण पावसकर, श्रीमती स्मिता वाघ, अरुणभाऊ अडसड, डॉ.नीलम गोऱ्हे (हे सदस्य 24 एप्रिल 2020 रोजी निवृत्त होणार आहेत) तर श्रीमती हुस्नबानू खलिफे, जनार्दन चांदुरकर, आनंदराव पाटील, रामहरी रुपनवर, प्रकाश गजभिये, श्रीमती विद्या चव्हाण, ख्वाजा बेग, जगन्नाथ शिंदे (हे सदस्य 6 जून 2020 रोजी निवृत्त होणार आहेत) तसेच प्रा. जोगेन्द्र कवाडे, अनंत गाडगीळ हे सदस्य (हे सदस्य 15 जून 2020 रोजी निवृत्त होणार आहेत).

यावेळी, संसदीय कार्यमंत्री अनिल परब, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, तसेच शरद रणपिसे, भाई गिरकर यांनी त्यांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. निवृत्त सदस्यांनी यावेळी आपल्या भावना व्यक्त केल्या.

1 मे रोजी विधानपरिषद व विधानसभेच्या आजी-माजी सदस्यांचा स्नेहमेळावा-सभापती रामराजे नाईक-निंबाळकर

1 मे रोजी विधानपरिषद व विधानसभेच्या आजी-माजी सदस्यांचा स्नेहमेळावा आयोजित करण्यात यावा, अशा सूचना विधानपरिषदेच्या सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी दिल्या. तसेच निवृत्त सदस्यांना शुभेच्छाही दिल्या.

विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा राष्ट्रगीताने संस्थगित करण्यात आले. पुढील अधिवेशन दिनांक 22 जून 2020 रोजी होईल.