मुंबई, दि. २६ : संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळामार्फत (लिडकॉम) विविध योजना व उपक्रम राबविण्यात येत आहेत. या अंतर्गत राज्यातील २५ हजार युवकांना उद्योजकता प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यामुळे युवकांना स्वयंरोजगार मिळणार असल्याचे मुख्य सचिव डॉ. नितीन करीर यांनी सांगितले.
लिडकॉमच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त त्रिमूर्ती प्रांगण, मंत्रालय मुंबई येथे आयोजित चर्मवस्तु प्रदर्शनाचे उद्घाटन श्री. करीर यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. हे प्रदर्शन १ मार्चपर्यंत सुरू राहणार आहे.
या कार्यक्रमास आमदार सरोज आहिरे, सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे, कोकण विभागीय आयुक्त महेंद्र कल्याणकर, संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक धम्मज्योती गजभिये, चर्मकार महासंघाचे अध्यक्ष संजय खामकर उपस्थित होते.
श्री. करीर म्हणाले की, महामंडळामार्फत चर्मकार समाजातील व्यक्तींचा शैक्षणिक, आर्थिक व सामाजिक विकास होण्यासाठी विविध योजना राबविण्यात येतात. त्यांचा जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा. महामंडळाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांना त्यांनी यावेळी शुभेच्छा दिल्या.
सचिव श्री.भांगे म्हणाले की, सामाजिक न्याय विभागाच्या वतीने एक लाख उमेदवारांना प्रशिक्षण देऊन त्यांना स्वयंरोजगार देण्याचे उद्दिष्ट आहे. त्याचाच भाग म्हणून आज राज्यातील 25 हजार उमेदवारांना प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन होत आहे. महामंडळामार्फत चर्मकार समाजातील व्यक्तींचा शैक्षणिक, आर्थिक व सामाजिक विकास होण्यासाठी विविध केंद्र व राज्यशासनाच्या योजना राबविल्या जात आहेत.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात श्री. गजभिये म्हणाले, चर्मोद्योग व्यवसायवाढीसाठी लिडकॉम नेहमीच पुढाकार घेते. रायगडमध्ये मेगा लेदर क्लस्टर पार्क व देवनार येथे लेदर पार्क उभारण्यात येणार आहे. राज्यात क्लस्टर धोरण असावे यासाठी लिडकॉमच्या वतीने प्रयत्न करण्यात येत आहेत.
कोल्हापूरी चपलांना जी.आय. नामाकंन मिळाले आहे. महामंडळाच्या कोल्हापूरी चपलांकरिता ब्लॉक चैन अंतर्गत क्यूआर कोड प्रणाली विकसित करण्यात आली आहे. त्याचे आज अनावरण करण्यात आले. देवनार येथे लेदर पार्क, बेसलाईन सर्वेक्षण करण्यासाठी सीएलआरआय (CLRI) चेन्नई यांच्या समवेत सामंजस्य करार करण्यात आला. तसेच महामंडळाच्या नवीन लोगोचे अनावरणही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. एम.सी.ए.डी. मार्फत २५ हजार विद्यार्थ्यांना उद्योजकता प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटनही यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कल्पिता राणे यांनी केले. लिडकॉमच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित चर्मवस्तु प्रदर्शनाचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांमार्फत करण्यात आले आहे.
०००