मुंबई दिनांक २६: कल्याण ते शिळ या रस्त्यास वै.ह.भ.प. श्री संत सावळाराम महाराज म्हात्रे यांचे नाव देण्यास राज्य मंत्रिमंडळाच्या दि. २५ फेब्रुवारीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी यासंदर्भात मागणी केली होती.
भिवंडी-कल्याण-शिळफाटा या रस्त्याच्या काँक्रिटीकरण करून तो सहापदरी करण्याचे काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून सुरु आहे. या रस्त्यांपैकी कल्याण ते शिळ या रस्त्यास वै.ह.भ.प. श्री संत सावळाराम महाराज म्हात्रे यांचे नाव देण्यात येईल. या प्रकल्पांतर्गत येत असलेल्या कल्याण शहरातील रेल्वे उड्डाणपुलाच्या कामात झालेली वाढ तसेच रस्त्याचे डांबरीकरणा ऐवजी क्राँक्रीटीकरणाने सहापदरीकरण करणे यानुषंगाने या प्रकल्पासाठी यापूर्वीच सुधारित बांधकाम खर्चापोटी रु.५६१.८५ कोटीस प्रशासकीय मान्यता देण्यात आली असून सध्या रस्त्याचे बांधकाम प्रगतीपथावर आहे.
०००