नागपूरचे विभागीय क्रीडा संकुल आंतरराष्ट्रीय दर्जाचे उभारण्याचा निर्णय

0
4

मुंबई ता.२६ : ‘बालेवाडी पुणे येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलाच्या धर्तीवर नागपूर येथील विभागीय क्रीडा संकुलामध्ये खेळाडू, प्रशिक्षकांना राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रीडा सुविधा उपलब्ध व्हाव्यात, तसेच राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरील क्रीडास्पर्धा आयोजित करता याव्या, यासाठी राज्यस्तरीय क्रीडा संकुलाचा दर्जा देण्यास आला. तसेच संकुलाचे अद्ययावतीकरण व नुतनीकरणासाठी ७४६.९९ कोटीच्या सुधारीत अंदाजपत्रकास दि. २५ रोजी मंत्रिमंडळाची मान्यता देण्यात आल्याची माहिती क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी दिली.

शिवछत्रपती क्रीडा संकुलाच्या धर्तीवर नागपूर विभागीय क्रीडा संकुलाचे अद्ययावतीकरण व नुतनीकरण करण्याचे प्रस्तावित होते. त्यानुसार स्विमिंग पूल, स्क्वॅश कोर्ट, टेनिस कोर्ट, बास्केटबॉल कोर्ट, आर्चरी रेंज, हॉकी, फुटबॉल पॅव्हेलियन इ. खेळांच्या राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा उभारण्यात येणार आहे. त्यामुळे विदर्भातील खेळाडू, प्रशिक्षकांना मोठ्या प्रमाणात सुविधा उपलब्ध होणार आहे.

नागपूर विभागीय क्रीडा संकुलासाठी राज्य योजनेतून यापूर्वी रु. ५१. २० कोटी, जिल्हा नियोजन समितीकडून क्रीडांगण विकास योजनेस १२  कोटी असा एकूण ६३.२० कोटी इतका निधी वितरीत करण्यात आला आहे. आता नागपूर विभागीय क्रीडा संकुलाच्या अद्ययावतीकरण व नुतनीकरणासाठी रु.६८३.७९ कोटीचे अंदाजपत्रक प्राप्त झाले आहे. त्याप्रमाणे नागपूर विभागीय क्रीडा संकुलास शिवछत्रपती क्रीडा संकुलाच्या धर्तीवर राज्यस्तरीय क्रीडा संकुलाचा दर्जा देवून संकुलामध्ये नवीन सुविधा उभारण्यासाठी ७४६.९९ कोटी रुपयांची मान्यता देण्यात आली, असे मंत्री श्री. बनसोडे म्हणाले.

०००

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here