माटुंगा लेबर कॅम्प परिसरात पंचशील कमान उभारण्यास प्राधान्य द्यावे – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

मुंबई, दि. २७ : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त चैत्यभूमी, दादर आणि दीक्षाभूमी, नागपूर येथील कार्यक्रम भव्यदिव्य होण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे. माटुंगा लेबर कॅम्प हा परिसर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झाला आहे. यामुळे या परिसरात पंचशील कमान उभारण्यास बृहन्मुंबई महानगरपालिकेने प्राधान्य द्यावे, असे निर्देश केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिले.

 

सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त करण्यात येणाऱ्या तयारीचा आढावा घेतला. बैठकीला माजी राज्यमंत्री अविनाश महातेकर, सामाजिक न्याय विभागाचे आयुक्त ओमप्रकाश बकोरिया, अपर पोलीस आयुक्त अनिल बारसकर, मनपाचे उपायुक्त प्रशांत सपकाळे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीचे सरचिटणीस नागसेन कांबळे, समितीचे उपाध्यक्ष महेंद्र साळवे, यांच्यासह प्रवीण मोरे, रेल्वे, जिल्हाधिकारी कार्यालयाचे अधिकारी, समितीचे सदस्य उपस्थित होते.

केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री श्री. आठवले यांनी सांगितले की, सामाजिक न्याय, गृह विभाग आणि बृहन्मुंबई महानगरपालिकेसमवेत सर्व विभाग डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त राज्यभर समन्वय करतात. चैत्यभूमी व दीक्षाभूमी येथे येणाऱ्या अनुयायांसाठी विविध सुविधा उपलब्ध करून देतात. समन्वय समिती, नागरिकांकडून नव्याने आलेल्या सूचनांचाही सुविधांमध्ये समावेश करावा. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती कार्यक्रमासाठी देशभरातून लाखो अनुयायी येतात. त्यांना कोणत्याही प्रकारची अडचण भासणार नाही, याची दक्षता संबंधित विभागांनी परस्पर समन्वय ठेवून घ्यावी. पाण्याची, शौचालयाची व्यवस्था चोख करावी. चैत्यभूमी व दीक्षाभूमी येथील स्तूपाची रंगरंगोटी, सजावट आणि रोषणाईच्या चांगल्या सुविधा द्याव्यात. ठिकठिकाणी दिशादर्शक फलक लावावेत. स्मशानभूमीच्या चिमणीची स्तूपावरील काळवटपणा जाण्यासाठी उपाययोजना करण्याच्या सूचना बृहन्मुंबई महानगरपालिकेला देण्यात आल्या.

अनुयायाच्या मागणीनुसार पाणी, लाडूंची संख्या वाढवावी

देशभरातील लाखो अनुयायी चैत्यभूमी व दीक्षाभूमी येथे येतात. उन्हाळ्याचे दिवस असल्याने शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी. तसेच अनुयायींची मागणी असल्याने बृहन्मुंबई महानगरपालिकेने लाडूंची संख्याही वाढवावी, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती कार्यक्रमाचे लाईव्ह प्रक्षेपण

दरवर्षीप्रमाणे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती कार्यक्रमाचे लाईव्ह प्रक्षेपण दूरदर्शन, फेसबुक याशिवाय विविध समाजमाध्यमाद्वारे होण्यासाठी प्रयत्न करावेत. जेणेकरून घरी असणाऱ्या अनुयायांना डॉ. बाबासाहेबांचे दर्शन घेता येईल. शिवाय राज्यभरातील डॉ. बाबासाहेबांच्या पुतळ्याचे सौंदर्यीकरण करण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या.

विविध स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करावे

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने बाबासाहेबांच्या विचारांवर परिसंवाद, विविध स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करावे. या माध्यमातून बाबासाहेबांना अभिवादन करण्याचे आवाहनही श्री. आठवले यांनी केले. फिरते शौचालय, साफसफाई, सुशोभीकरणावर भर द्यावा, अशा सूचनाही त्यांनी केल्या.

पोलीस विभागाने वाहतूक व्यवस्था, कायदा सुव्यवस्थेवर भर द्यावा

लाखोंच्या संख्येने अनुयायी येत असल्याने गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेवून यासाठी रांगेची चोख व्यवस्था करावी. शिवाय वाहतूक व्यवस्था, दिशादर्शक फलक, कायदा सुव्यवस्था चोख ठेवावी, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

माटुंगा येथे पंचशील कमान उभारण्यासाठी संबंधित विभागाकडे परवानगी मागितली असून प्रस्ताव सादर केल्याची माहिती नागसेन कांबळे यांनी दिली.

समन्वय समितीच्या सूचना

वॉटरप्रुफ मंडपाची व्यवस्था, दिवसभर प्रसिद्ध कलाकारांचा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात यावा. इंदू मिल स्मारकाबाबत होर्डिंग्ज, १५ मिनिटांचा लघुपट दाखविण्यात यावे. चेंबूरच्या उद्यानात अखंड भीमज्योत उभारण्यात यावी. जयंती काळात दादर रेल्वे स्थानक परिसर फेरीवालामुक्त करावे, चैत्यभूमी परिसरातील मद्य दुकाने, बियरबार बंद ठेवावे. रेल्वेने मेगा ब्लॉक टाळावा, शिवाय रात्री उशिरापर्यंत लोकल ट्रेन सुरू ठेवावी. समाजभूषण पुरस्कार द्यावेत. विधानभवनात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे तैलचित्र लावावे, अशा सूचना यावेळी करण्यात आल्या.

बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे अशोक स्तंभ, भीमज्योतींची सजावट, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित लेजर शो, दुर्मिळ फोटोंचे प्रदर्शन, उद्यानाचे सुशोभिकरण, 24 ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेऱ्याची व्यवस्था, दोन स्पीड बोटी, स्वच्छतेसाठी पाच पाळ्यात 290 कर्मचारी, वैद्यकीय सुविधांची माहिती उपायुक्त श्री. सपकाळे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त केलेल्या उपाययोजना, कामांची माहिती सादरीकरणातून दिली.

०००

धोंडिराम अर्जुन/ससं/