प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवीन रेल्वे मार्ग व रस्ते कामांचे लोकार्पण

मुंबई, दि. २७ : राज्यातील दळणवळण अधिक गतिमान करण्यासाठी रेल्वे मार्ग, रस्ते प्रकल्पांची कामे सुरू आहेत. यापैकी वर्धा – नांदेड या नवीन रेल्वे मार्गावरील 645 कोटी रूपये खर्चाच्या वर्धा ते कळंब (जि. यवतमाळ) या 39 कि.मी लांबीचा रेल्वे मार्ग  व अहमदनगर-बीड-परळी या रेल्वेमार्गावरील 645 कोटी रूपये खर्च आलेल्या न्यु आष्टी ते अंमळनेर (जि. बीड) या 32.84 कि.मी लांब रेल्वे मार्गाचे लोकार्पण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दि. 28 फेब्रुवारी रोजी  यवतमाळ येथे करण्यात येणार आहे. तसेच वर्धा- कळंब स्टेशनपर्यंत नवीन रेल्वेला व अंमळनेर ते न्यू आष्टी रेल्वे स्थानकापर्यंत विस्तारीत डेमू रेल्वे सेवेचा आरंभ प्रधानमंत्री यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून करण्यात येणार आहे.

रस्ते प्रकल्पांमध्ये 291 कोटी खर्चाच्या साकोली – भंडारा जिल्हा सीमेपर्यंत 55.80 कि.मी दुपदरी रस्ता काम, 378 कोटी रूपये खर्च असलेल्या सलाई खुर्द – तिरोडा (जि. गोंदीया) महामार्गावरील 42 कि.मी लांबीच्या क्राँक्रीटीकरण रस्ता काम, तसेच 483 कोटी रूपये खर्च आलेल्या वरोरा – वणी (जि. यवतमाळ) महामार्गावरील 18 कि.मी लांबीच्या चौपदरीकरण कामाचे लोकार्पणही प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.  आयुष्मान भारत – जन आरोग्य योजनेंतर्गत राज्यातील एक कोटी लाभार्थ्यांना आयुष्मान भारत कार्डचे वितरण करण्यात येणार आहे. यावेळी प्रातिनिधीक स्वरूपात तीन लाभार्थ्यांना कार्डही प्रधानमंत्री यांच्या हस्ते वितरीत करण्यात येणार आहे.

०००

निलेश तायडे/विसंअ/