मुख्यमंत्री जनकल्याण कक्षाचा उपक्रम….

मुंबई, दि. २८: मुख्यमंत्री जनकल्याण कक्षाच्या वतीने सामाजिक उत्तरदायित्व निधी (सीएसआर) मधून  अंगणवाडी तसेच शालेय विद्यार्थ्यांना डेस्कबॅग वाटपाचा नाविन्यपूर्ण उपक्रम हाती घेण्यात आला आहे. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.  कुर्ला पाईपलाईन भागातील १३८ क्रमांकाच्या अंगणवाडीतील मुलांना या डेस्कबॅगचे वाटप मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात करण्यात आले.

‘वर्षा’ निवासस्थानी हा कार्यक्रम झाला. यावेळी एसबीआय कॅपिटलचे व्यवस्थापकीय संचालक वीरेंद्र बन्सल, कृष्णन कुट्टी, रोशन नेगी, सहकार देवगिरीचे फाऊन्डेशनचे संचालक राजेंद्र जोशी, अनंत अंतरकर, मुख्यमंत्र्यांचे खाजगी सचिव तथा मुख्यमंत्री जनकल्याण कक्षाचे प्रमुख डॉ. अमोल शिंदे आदी उपस्थित होते.

सीएसआर निधीमधून लोकाभिमुख कामांचे नियोजन आणि अंमलबजावणीसाठी मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. ‘शासन आपल्या दारी’ ‘मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान तसेच दिव्यांग बांधवांसाठी आणि सहकारी गृहनिर्माण संस्थांसाठी विविध साधनांचे आणि उपयुक्त उपकरण संचांचे वाटप जनकल्याण कक्षातर्फे करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांना डेस्कबॅग वाटपासाठी एसबीआय कॅप्स मार्केटकडून उपलब्ध सीएसआर निधीतून ठाणे आणि पालघर येथील ३०३० विद्यार्थ्यांना तर  ऑन लॅबोरेटरिज लिमिटेड यांच्याकडील सी एस आर मधून  अंगणवाड्यांमधील ४६०० मुलांना ह्या डेस्कबॅगचे वाटप करण्यात येणार आहे. आज त्यातील काही मुलांना प्रातिनिधिक स्वरूपात त्याचे वाटप झाले.

यावेळी मुख्यमंत्र्यांनी लहानग्यांशी संवाद साधत चांगला अभ्यास करा, पहिला नंबर मिळवा.. अभ्यासासोबत भरपूर खेळा असे मुख्यमंत्र्यांनी मुलांना सांगितले.

डेस्कबॅग ह्या वजनाने अगदी हलक्या असून स्कूल बॅगबरोबरच फोल्डिंग डेस्कची देखील सुविधा त्यात आहे. या बॅगमुळे विद्यार्थ्यांचा उत्साह वाढण्यास मदत होणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.

0000