महासंस्कृती महोत्सवाचे पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्या हस्ते उद्घाटन

सांगली  दि. २ (जिमाका) :महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य विभाग व सांस्कृतिक कार्य संचालनालय मुंबई व सांगली जिल्हा प्रशासन यांच्यावतीने दि 2 ते 6 मार्च या कालावधीत कल्पद्रुम मैदान येथे आयोजित करण्यात आलेल्या महासंस्कृती महोत्सवाचे पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्या हस्ते उद्घाटन झाले.

यावेळी आमदार सुधीर गाडगीळ मंत्री श्री .खाडे यांच्या सुविद्य पत्नी श्रीमती सुमन खाडे, जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे, पोलीस अधिक्षक संदीप घुगे, अपर जिल्हाधिकारी डॉ. स्वाती देशमुख, निवासी उप जिल्हाधिकारी ज्योती पाटील, मनपा उपायुक्त स्मृती पाटील आदी उपस्थित होते.

यावेळी मंत्री श्री. खाडे म्हणाले की, सांगली जिल्ह्याला कला, साहित्य, संगीत, क्रीडा आदी बाबींची समृद्ध आणि उज्ज्वल सांस्कृतिक परंपरा आहे. जिल्ह्यातील स्थानिक कलावंताना वाव देण्यासाठी शासनाच्यावतीने हा उपक्रम राज्यातील सर्व जिल्ह्यात सुरू करण्यात आला आहे. मराठी रंगभूमीची सुरुवात सांगलीमधूनच झाल्याचे सांगून राज्य शासनाच्या या उपक्रमाला सांगली जिल्ह्यातील रसिक प्रेक्षकांनी उंदड प्रतिसाद द्यावा, असे आवाहन केले. याप्रसंगी आमदार सुधीर गाडगीळ यांनी ही आपले विचार व्यक्त केले. तत्पूर्वी श्री. खाडे आणि आ. गाडगीळ यांनी या मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या प्रदर्शनाला भेट देवून समाधान व्यक्त केले. कार्यक्रमाच्या प्रारंभी राज्यगीत सादर करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अपर जिल्हाधिकारी डॉ. स्वाती देशमुख यांनी केले.

०००