समृद्धी महामार्गाच्या धर्तीवर कोकणमध्ये ग्रीनफिल्ड महामार्ग

रायगड,रत्नागिरी आणि सिंधुदुर्गच्या  किनारपट्टीजवळून जाणार-सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री. एकनाथ शिंदे

मुंबई,दि.14 :हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या धर्तीवर500 किलोमीटर लांबीचा ग्रीनफिल्ड महामार्ग (Express Way)कोकणच्या किनारपट्टीवर अस्तित्वात येणार आहे. सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री श्री. एकनाथ शिंदे यांनी विधिमंडळात एका निवेदनाद्वारे ही माहिती दिली. कोकणाच्या सर्वांगिण विकासासाठी रायगड,रत्नागिरी आणि सिंधुदूर्ग या तिन्ही जिल्ह्यांना जोडणारा हा महामार्ग बांधण्याचे नियोजन करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

शिवडी ते न्हावा शेवा पोर्ट (एमटीएचएल) जिथे संपतो त्या रायगड जिल्ह्यातील चिर्ले गावापासून महाराष्ट्र – गोवा सीमेवरील पात्रादेवी पर्यंत सुमारे500 किलोमीटर लांबीचा हा महामार्ग असेल. या मार्गाची आखणी कोकणपट्टीच्या किनाऱ्याजवळून करण्यात येणार आहे. त्यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना कोकणचे निसर्गसौंदर्य पाहता येईल,शिवाय समुद्र किनाऱ्यालगतच्या पर्यटन विकासालाही चालना मिळेल. पर्यटनाबरोबरच कृषी उद्योगालाही चालना मिळावी अशी अपेक्षा या महामार्गाच्या निर्मितीमागे आहे. या महामार्गामुळे कोकणातील हापूस आंबा,काजू,सुपारी,नारळ इत्यादी उत्पादनांसाठी थेट आंतरराष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध होऊ शकेल.

या ग्रीनफिल्ड महामार्गासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळास (एमएसआरडीसी) तांत्रिक आणि वित्तीय सुसाध्यता अहवाल तयार करण्याचे निर्देश देण्यात येत आहेत. तसेच हे नियोजन करत असताना स्थानिकांना विश्वासात घेऊन आणि कोकणाचे सौंदर्य अबाधित ठेवून तसेच पर्यावरणाचा समतोल राखून नियोजन करण्यात येईल,असे मंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.