खानदेश कलाकारांची, संताची भूमी ; पुढच्या पिढीला हा समृद्ध वारसा समजावा, म्हणून हा महासंस्कृती महोत्सव  – पालकमंत्री गुलाबराव पाटील

0
10
जळगाव दि. 3 ( जिमाका ) खानदेश ही कलाकारांची, संताची भूमी आहे.या भूमीतील लोककलेचं जतन व संवर्धन करण्यासाठी आपण लोककलाकारांनी नव्या पिढीला या दुर्मिळ होत चाललेल्या कलांची ओळख करून दिली त्या बद्दल आपले मनस्वी आभार व्यक्त करून या आपल्या समृद्ध कला व परंपराचे जतन करण्यासाठीच हा महासंस्कृती महोत्सव ठेवला असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.
 
   महासंस्कृती महोत्सवाच्या आजचा शेवटच्या समारोप दिनी आयोजित कार्यक्रमात तें बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, उपजिल्हाधिकारी अर्चना मोरे,जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकाश लोखंडे,सिने अभिनेत्री रिंकू राजगुरु मंचावर उपस्थित होते.
    या महोत्सवात भुसावळचे बुरगुंडा भारूड, करपावली, एकालग्न येथील शिवकालीन भाषा, शाहिरी परंपरा, पहाडी आवाजतील छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरील पोवाडे, तसेच शिवकालीन शस्त्रे, आरामार याचे दुर्मिळ प्रदर्शन या ठिकाणी भरविण्यात आले. याबरोबर आमच्या भगिनींच्या कष्टानी निर्माण झालेल्या बचत गटाच्या माध्यमातून तयार केलेल्या वस्तूचे स्टॉल, खानदेशच्या खाद्य संस्कृतीची ओळख देणारे स्टॉल उभारले गेले. त्यातून त्यांची आर्थिक उलाढाल झाली. हे बळ त्यांना आर्थिक स्थिरता मिळवून देण्यासाठी मदतीचं ठरेल. त्यामुळे असे महोत्सव दर वर्षी घेण्याचा आमचा मानस असल्याचेही पालकमंत्री यांनी यावेळी सांगितले.
    जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी या महोत्सवा मागची संकल्पना विशद केली. स्थानिक कला, दुर्मिळ कला, ऐतिहासिक शौर्य कथा, हे सादर करणारे कलाकार या सर्वांना मंच देण्याचे काम या महासंस्कृती महोत्सवाच्या मंचावरून झाल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
 रिंकू राजगुरूचे जळगावकरांनी केले उत्स्फूर्त स्वागत
 जळगाव सांस्कृतिक महोत्सवाच्या शेवटच्या दिवशी सैराट फेम अभिनेत्री रिंकू राजगुरु उर्फ आर्ची हिच्या आगमनावेळी प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. रिंकू राजगुरुने प्रेक्षकांशी संवाद साधताना अत्यंत महत्वाचे वाक्य बोलली, ती म्हणाली माझ्या आई वडिलांनी मला शिक्षण शिकताना अभ्यास करायला सांगितला पण एवढीच टक्केवारी किंवा तुला हेच व्हावे लागेल हे माझ्यावर लादलं नाही म्हणून मी माझी कला जोपासू शकले. ह्या तिच्या वाक्यावर प्रेक्षकांनी टाळ्या वाजवून प्रतिसाद दिला.
तीन बचत गटांचा गौरव
महासंस्कृती महोत्सवातील पाचही दिवस मुक्ताई सरस प्रदर्शनाला लोकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. त्यातील गायत्री बचत गट, पळसखेडे, जय जिजाऊ बचत गट,शिरोड आणि वडनगर येथील बचत गटाच्या महिलांचा प्रतिनिधीक गौरव केला.
     आज शेवटच्या दिवशी स्थानिक कलाकारांनी अवधेय- एक आदर्श हे गीत रामायणावर आधारित नृत्य सादर केलं. त्याला प्रेक्षकांनी मोठी पसंदी दिली. आणि शेवटचा कार्यक्रम होता तें वसंत कानेटकर लिखित ‘ जेंव्हा रायगडाला जाग येते तेंव्हा ‘ हे नाटक. या ऐतिहासिक नाटकालाही प्रेक्षकांनी उत्तम प्रतिसाद दिला.
 अपर्वा वाणी यांनी महासंस्कृती महोत्सवाचे पाचही दिवस सूत्रसंचालन केले. आज त्यांच्या जोडीला रिंकू राजगुरूला बोलतं करण्यासाठी आर जे शिवानी होती.
00000

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here