ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात संपूर्ण स्वच्छता मोहीम राबवावी – उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाई

मुंबई, दि. ४ : ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात पुढील एक महिना संपूर्ण स्वच्छता मोहीम राबविण्यात यावी. मोहीम कालावधीत ग्रामीण भागात असलेल्या कचऱ्याची विल्हेवाट लावावी. महामार्गांच्या आजुबाजूला असलेला कचरा उचलून रस्ते स्वच्छ करावे, असे निर्देश राज्य उत्पादन शुल्क मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री शंभुराज देसाई यांनी आज दिले.

सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित स्वच्छता अभियान बैठकीत मंत्री श्री. देसाई बोलत होते. बैठकीला ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, जिल्हा पोलीस अधिक्षक श्री. स्वामी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (स्वच्छता) व संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

ग्रामपंचायत हद्दीतील कचरा उचलून त्याचे निर्मूलन करण्याच्या सूचना देत मंत्री श्री. देसाई म्हणाले, पुढील आठ दिवसात संपूर्ण कचऱ्याची विल्हेवाट करावी. कचऱ्यातून प्लॅस्टीक वेगळे काढून अन्य कचऱ्यावर कंपोस्ट खताची प्रक्रिया करावी. महानगरपालिका व नगरपालिका यांनी त्यांच्या हद्दी लगतच्या भागातील कचरा उचलावा. पुढील एक महिना प्रभावीपणे ही मोहीम राबवावी. रस्त्यांच्या आजुबाजूला असलेला मागील कचरा जोपर्यंत उचलला जाणार नाही, तोपर्यंत रस्ते स्वच्छ होणार नाहीत.

याबाबत सर्व गटविकास अधिकारी, नगरपालिका मुख्याधिकारी व संबंधित विभागांचे अधिकारी यांनी कार्यवाही करण्याच्या सूचनाही मंत्री श्री. देसाई यांनी दिल्या.

****

निलेश तायडे/विसंअ/