शासकीय तंत्रनिकेतन इमारतींच्या सुशोभीकरणाची कामे तातडीने पूर्ण करा – सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण

0
8

मुंबई, दि. ५ : शासकीय तंत्रनिकेतन इमारतींची दुरुस्ती, रंगकाम, सुशोभीकरण संदर्भातील कामे वेगात पूर्ण करावीत. यासाठी विभागनिहाय संबंधित मुख्य अभियंता यांच्या देखरेखीखाली निविदेसंदर्भातील कामे तातडीने पूर्ण  करण्यात यावी, असे निर्देश सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिले.

शासकीय तंत्रनिकेतन इमारतींची डागडूजी, रंगकाम, सुशोभीकरण फेसलिफ्टिंग करण्याबाबत आढावा बैठक सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली व उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत झाली.

बैठकीला उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाचे संचालक डॉ. विनोद मोहितकर, प्राध्यापक व विभाग प्रमुख डॉ.के.के सांगळे स्ट्रक्चरल अभियांत्रिकी व्ही. जे. टी. आय मुंबई, राज्यातील तंत्र शिक्षण विभागीय सर्व सहसंचालक (दुरदृष्य संवाद प्रणालीद्वारे), सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुंबईचे मुख्य अभियंता तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे विभागीय  मुख्य अभियंता ,सर्व प्राचार्या (दुरदृष्य संवाद प्रणालीद्वारे) उपस्थित होते.

सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री. चव्हाण म्हणाले की, ४० शासकीय तंत्रनिकेतनांचे फेसलिफ्टिंग करण्याकरिता अंदाजपत्रकानुसार रु. २६९.११ कोटी इतका निधी लागणार आहे. यासाठी प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आलेली आहे, त्यानुषंगाने सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने विभागनिहाय संबंधित मुख्य अभियंता यांच्या देखरेखेखाली एकच निविदा प्रसिद्ध करण्याचे निर्देश मंत्री  श्री. चव्हाण यांनी  दिले.

या फेसलिफ्टिंगची कामे करण्याकरिता निधी उपलब्ध असल्याने तातडीने निविदा प्रक्रिया अंतिम करून कालबद्ध पद्धतीने कामे पूर्ण करावीत.

संबंधित मुख्य अभियंता यांनी त्यांच्या अखत्यारित संस्थांचे बांधकाम जलदगतीने करण्याकरिता विस्तृत अंदाजपत्रकास त्वरित तांत्रिक मान्यता प्रदान करुन निविदा प्रसिद्ध करावी. याबाबत वेळापत्रकाची निश्चिती करावी. याकरिता ६५ टक्के निधी संस्था व संचालनालयाकडे उपलब्ध असून निधीअभावी पुढील प्रक्रिया थांबविण्याची आवश्यकता नाही, असेही श्री. चव्हाण यांनी सांगितले.

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री श्री. पाटील म्हणाले की, सार्वजनिक बांधकाम विभागाकरिताची व संस्थेच्या प्राचार्य व संबंधित अधिकाऱ्यांकरिताची आदर्श कार्यपद्धती याची अंमलबजावणी करण्यात यावी. फेसलिफ्टिंगची कामे गुणवत्तापूर्ण करण्याकरिता करावयाची उपायोजना करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

श्री. पाटील यांनी विभागनिहाय कामाचा आढावा घेऊन विभागातील कामांची प्रगती व  सद्यस्थिती याविषयी सविस्तर माहिती जाणून घेतली.

0000

प्रविण भुरके/ससं/

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here