देशाच्या महासत्ता होण्याच्या वाटचालीत महाराष्ट्राच्या शिक्षण क्षेत्राचा मोलाचा वाटा असणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, दि. 5 : बालकांवर संस्कार करून देशाचे भविष्य घडविण्याचे काम शाळांमधून होत असते. स्पर्धात्मक युगात विद्यार्थी मागे राहणार नाही यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी शिक्षण क्षेत्राच्या उन्नतीसाठी स्वत: लक्ष देत असून 2047 पर्यंत भारत महासत्ता होण्याच्या प्रधानमंत्री यांच्या स्वप्नपूर्तीच्या दिशेने महाराष्ट्र अग्रेसर राहावा यासाठी राज्य शासनामार्फत सातत्याने प्रयत्न करण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा अभियान नुकतेच राज्यात राबविण्यात आले, या अभियानादरम्यान तीन उपक्रमांचे रेकॉर्ड झाले असून ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस्’ च्या वतीने प्रमाणपत्र देण्यात आल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्यासह संपूर्ण यंत्रणेचे अभिनंदन केले.

मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ अभियान राज्यात 1 जानेवारी ते 15 फेब्रुवारी 2024 या कालावधीत राबविण्यात आले. यादरम्यान घेण्यात आलेल्या स्पर्धेतील विजेत्या शाळांचा पारितोषिक देऊन मुख्यमंत्री श्री.शिंदे यांच्या हस्ते आज गौरव करण्यात आला. शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, आमदार सर्वश्री कपिल पाटील, विक्रम काळे, शेखर निकम, राजेश पाटील, प्रधान सचिव रणजितसिंह देओल, शालेय शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांच्यासह शालेय शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकारी, विजेत्या शाळांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.   

मुख्यमंत्री श्री.शिंदे म्हणाले, आई जशी बाळाला लळा लावते त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना देखील शाळेचा लळा लागत असतो. या शाळेतील वातावरण आनंददायी असावे तसेच शिक्षक, पालक, विद्यार्थी, माजी विद्यार्थी यांच्यामध्ये शाळेप्रती उत्तरदायित्वाची भावना निर्माण व्हावी व त्यायोगे स्पर्धात्मक वातावरणातून विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी प्रेरणादायी वातावरण मिळावे यासाठी हे अभियान राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. याद्वारे ठरविलेले उद्दिष्ट साध्य झाले असून यात एक लाखांहून अधिक शाळांमधून सुमारे दोन कोटी विद्यार्थी सहभागी झाले. त्याचप्रमाणे अभियान कालावधीत राबविण्यात आलेल्या ‘वाचन सवय प्रतिज्ञा’, एका दिवसात शिक्षण विषयक हस्तलिखित अभिप्राय अपलोड करणे तसेच वाचनाचे महत्त्व सांगणारा युट्युब वरील व्हिडीओ विद्यार्थी आणि पालकांनी बघणे या तीनही उपक्रमांची दखल घेऊन ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’ मध्ये नोंद घेतली गेली ही राज्याच्या दृष्टीने अतिशय गौरवास्पद बाब असल्याचे ते म्हणाले. शिक्षणमंत्री श्री. केसरकर यांनी यासाठी घेतलेल्या पुढाकाराबद्दल मुख्यमंत्र्यांनी त्यांचे कौतुक केले.

शासनाने नुकताच अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. यामध्ये अनेक जनहितार्थ निर्णय घेण्यात आले आहेत. सर्वसामान्य, कष्टकरी, शेतकरी, तरुण, तसेच महिलांच्या सक्षमीकरणासाठी अनेक योजना राबविल्या जात आहेत. नुकतीच सुधारित पेन्शन योजना लागू केली आहे, त्यामध्ये शिक्षकांचाही समावेश असल्याचे मुख्यमंत्री श्री.शिंदे यांनी सांगितले. उद्योग, परकीय थेट गुंतवणूक आदींसह सर्वच क्षेत्रात महाराष्ट्र अग्रेसर आहे. आजची पिढी ही उद्याचे भविष्य असल्याने शाळांच्या विकासासाठी विविध निर्णय घेण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री श्री.शिंदे यांनी सांगितले. शाळांना नवीन मान्यता देण्याची प्रक्रिया ऑनलाईन करण्यात आली. शाळांमधील पायाभूत सुविधा उत्तम असाव्यात यासाठी शाळा दत्तक देण्याचा निर्णय घेण्यात आला, यास अनेक उद्योजकांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे मुख्यमंत्री श्री.शिंदे यांनी यावेळी सांगितले.

मंत्री श्री. केसरकर यांनी अभियानाबाबत माहिती देऊन शालेय शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांना केंद्रस्थानी ठेवून घेतलेल्या विविध निर्णयांची माहिती दिली. शासनाच्या सर्व शाळांमधून सर्व विद्यार्थ्यांना गणवेश, बूट आणि सॉक्स देण्याचा निर्णय घेण्यात आला. सुमारे 75 हजार शाळांची देखभाल दुरुस्ती करण्याकरिता शाळा दत्तक घेण्याचा निर्णय घेण्यात आला. शालेय पोषण आहारात अंड्यांचा समावेश करण्यात आला. व्यावसायिक शिक्षणावर भर देण्यात येऊन रोजगार निर्मितीसाठी जर्मनी सोबत करार करण्यात आला.

राज्यस्तरीय पुरस्कार

मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते यावेळी राज्यस्तरावर शासकीय गटात प्रथम आलेल्या वाशिम जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळा, साखरा (51 लाख रुपये), द्वितीय क्रमांक मिळविलेल्या रायगड जिल्ह्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हेदवली (31 लाख रुपये) आणि तृतीय क्रमांक मिळविलेल्या सांगली जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळा ढालेवाडी (21 लाख रुपये) या शाळांचा रोख, सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला. तर इतर आस्थापनांच्या शाळांमध्ये प्रथम क्रमांक मिळविलेल्या नाशिक जिल्ह्यातील एस्पेलियर हेरिटेज स्कूल, बेळगाव ढगा (51 लाख रुपये), द्वितीय क्रमांक मिळविलेल्या पुणे जिल्ह्यातील शारदाबाई पवार विद्यानिकेतन शारदानगर (31 लाख रुपये) आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील भोंडवे पाटील शाळा बजाजनगर (21 लाख रुपये) या शाळांचा रोख, सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. याव्यतिरिक्त बृहन्मुंबई महानगरपालिका स्तरावर सहा, ‘अ’ आणि ‘ब’ वर्ग महानगरपालिका स्तरावर सहा, विभागस्तरावरील 48 शाळांचा यावेळी मान्यवरांच्या हस्ते रोख रक्कम, सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.

गिनीज बुक मध्ये नोंद

या अभियान कालावधीत 13 लाख 84 हजार 426 विद्यार्थ्यांनी ‘वाचन सवय प्रतिज्ञा’ घेतली. 24 तासांच्या कालावधीत 11 लाख 20 हजार 386 विद्यार्थ्यांनी शिक्षण विषयक हस्तलिखित अभिप्राय आणि फोटो बेसपोक प्लॅटफॉर्मवर अपलोड केले. तसेच वाचनाचे महत्त्व सांगणारा मंत्री श्री. केसरकर यांचा युट्युब वरील व्हिडीओ एकाच वेळी एक लाख 89 हजार 846 विद्यार्थी आणि पालकांनी लाईव्ह बघितला. या तीनही उपक्रमांची दखल घेऊन ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’ मध्ये नोंद घेतली गेल्याची माहिती गिनीज बुक चे प्रवीण पटेल यांनी जाहीर करून संबंधित प्रमाणपत्रे मुख्यमंत्री श्री.शिंदे यांच्याकडे सुपूर्द केली.

शिक्षण आयुक्त श्री.मांढरे यांनी प्रास्ताविकाद्वारे हे अभियान नवचेतना देणारे ठरल्याचे सांगून या अभियानात एक लाख तीन हजार म्हणजे सुमारे 95 टक्के शाळा तसेच सुमारे दोन कोटी विद्यार्थी सहभागी झाल्याची माहिती दिली. पुरस्कार प्राप्त शाळांना एकूण 66 कोटी 74 लाख रुपयांची पारितोषिके प्रदान करण्यात आली. या अभियानासाठी पुढाकार घेणाऱ्या मुख्यमंत्री श्री. शिंदे यांचे विशेष कार्य अधिकारी अमित हुक्केरीकर यांचा यावेळी विशेष सन्मान करण्यात आला.

0000

बी.सी. झंवर/विसंअ/