गारमेंट क्लस्टर राज्यातील महिलांना स्फूर्ती देण्याचे काम करेल – डाॅ.नीलम गोऱ्हे

0
8

500 महिलांना मिळणार हक्काचा रोजगार

महिलांसाठी राज्यातील पहिलेच क्लस्टर

यवतमाळ, दि. (जिमाका) : महिलांना आर्थिकदृष्ट्या समृद्ध करण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्यावतीने विविध उपक्रम राबविण्यात येत आहे. परंतु, पालकमंत्री संजय राठोड यांच्या संकल्पनेतून धामनगाव देव येथे केवळ महिलांसाठी सुरु करण्यात आलेले गारमेंट क्लस्टर राज्यातील महिलांना स्फूर्ती देण्याचे काम करेल, असे विश्वास महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उपसभापती डॅा.नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केला.

दारव्हा तालुक्यातील धामणगाव देव येथे पालकमंत्री संजय राठोड यांच्या संकल्पनेतून महिला आर्थिक विकास महामंडळाद्वारे जिल्हा वार्षिक योजना, महिला व बालविकास विभागाच्यावतीने ३ टक्के निधीमधून महिलांना रोजगार निर्माण करून देण्यासाठी कौशल्य प्रशिक्षण आधारीत गारमेंट क्लस्टर सुरु करण्यात आले आहे. त्याचे उद्घाटन आज झाले. त्यावेळी त्या बोलत होत्या.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पालकमंत्री संजय राठोड होते. यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्षा कालींदा पवार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे, माविमचे वरिष्ठ जिल्हा समन्वय अधिकारी डॅा.रंजन वानखेडे, उपविभागीय अधिकारी श्री. खडसे, सरपंच वनिता जाधव, पराग पिंगळे, माजी जिप सभापती श्रीधर मोहोड, संजय देशमुख, मनोज नाल्हे, संजय देशमुख, राजुदास जाधव आदी उपस्थित होते.

बचतगटाच्या माध्यमातून महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम होत आहे. महिला कर्जाची परतफेड नियमितपणे करत असल्याने बॅंका देखील महिलांना मोठ्या प्रमाणावर कर्ज उपलब्ध करून देतात. महिला ही शक्ती आहे. महिला एकत्र येतात, गरज पडल्यास संघर्ष देखील करतात. अलिकडे आर्थिक समृध्दीकडे महिला आपली वाटचाल करीत आहे. महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी शासन देखील विविध प्रकारचे उपक्रम राबवित असल्याचे डॅा.नीलम गोऱ्हे यांनी सांगितले.

यावेळी अध्यक्षीय भाषणात पालकमंत्री संजय राठोड यांनी धामनगाव देव येथे दारव्हा तालुक्यातील 500 महिलांना या क्लस्टरच्या माध्यमातून रोजगार मिळणार असल्याचे सांगितले. असेच क्लस्टर दिग्रस व नेर येथे देखील उभे राहणार असल्याचे ते म्हणाले. महिला कुटुंबाला आधार देण्याचे काम करतात. त्यामुळे ग्रामीण महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम झाल्या पाहिजे, ही शासनाची भावना आहे. त्यादृष्टीने राज्यात काम सुरु आहे. ग्रामीण भागात बचतगटांना ई-रिक्षा देण्यात येणार असल्याचे देखील पालकमंत्र्यांनी सांगितले.

जिल्ह्यातील शेतकरी तसेच महिलांच्या कल्याणासाठी काम केले जात आहे. सर्वसामान्य नागरिकांना सिंचन, वीजेच्या पायाभूत सुविधा, रस्ते, पाणी, शाळेतील विद्यार्थ्यांना स्मार्ट वर्गखोल्या उपलब्ध करून देण्यात येत असल्याचे पालकमंत्री पुढे बोलतांना म्हणाले. यावेळी मान्यवरांच्याहस्ते बचतगटाच्या महिलांना धनादेशाचे वितरण करण्यात आले. गाव विकास समितीच्या अध्यक्ष व सचिवांचा सत्कार देखील करण्यात आला. या क्लस्टरमध्ये प्रशिक्षक म्हणून नेमन्यात आलेल्या युवकांना नियुक्ती पत्र देण्यात आले. माविमचे वरिष्ठ जिल्हा समन्वय अधिकारी डॅा. रंजन वानखेडे यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमास बचत गटाच्या महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

०००

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here