- मौजे मुनावळे येथील जलपर्यटन प्रकल्पाचे भूमिपूजन
- पाटणमधील दरडग्रस्त कुटुंबांच्या कायमस्वरूपी पुनर्वसनाच्या प्रकल्पाचे भूमिपूजन,
- मौजे दरे येथील बांबू मूल्यवर्धन केंद्र आणि टसर रेशीम शाश्वत रोजगार व वनसंवर्धन प्रकल्पाचे लोकार्पण
सातारा, दि. ७ : मौजे दरे (ता. महाबळेश्वर) येथे साकारण्यात आलेल्या बांबू मूल्यवर्धन केंद्र आणि टसर रेशीम शाश्वत रोजगार व वनसंवर्धन प्रकल्पाचे लोकार्पण, तसेच मौजे मुनावळे (ता. जावळी) येथील महत्त्वाकांक्षी जलपर्यटन प्रकल्प आणि पाटण तालुक्यातील दरडग्रस्त कुटुंबांच्या कायमस्वरूपी पुनर्वसन प्रकल्पाचे भूमिपूजन शनिवारी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या हस्ते संपन्न होणार आहे. सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पर्यायी पूरक कृषी रोजगार मिळवून देणाऱ्या, तसेच पर्यटनवाढीला चालना देणाऱ्या आणि दरडग्रस्त कुटुंबांच्या पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लावणाऱ्या या प्रकल्पांचे लोकार्पण व भूमिपूजन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत ९ मार्च रोजी मौजे दरे, मौजे मुनावळे (ता. जावळी), मौजे धावडे (ता. पाटण) येथे होणार असल्याची माहिती पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली.
राज्यात महायुती सरकार सत्तेत आल्यापासून सातारा जिल्ह्यातील विविध प्रकल्पांना गती देण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी जिल्ह्यातील विविध प्रश्न मार्गी लावत सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण अशा प्रकल्पांना मान्यता व निधी मंजुरी मिळवली आहे. अलीकडेच मौजे मुनावळे (ता. जावळी) येथे महत्त्वाकांक्षी जलपर्यटन प्रकल्प विकसित करण्याच्या दृष्टीने मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या सूचनेनुसार पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या पाठपुराव्यातून कृष्णा खोरे विकास महामंडळ आणि महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला. त्यानुसार कोयना धरणापासून उत्तरेस सुमारे ४० किमी अंतरावर शिवसागर जलाशयात मुनावळे येथे हा जागतिक दर्जाचा नावीन्यपूर्ण जलपर्यटन प्रकल्प विकसित करण्यात येणार आहे. ४५ कोटी रुपये खर्चाच्या या प्रकल्पात पर्यटकांसाठी बोट क्लब, हाऊस बोट, स्कुबा डायव्हिंग, जेट स्की यांसारख्या अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. जलपर्यटन आणि जलक्रीडा यांचा समावेश असलेला आणि नदी जलाशयावर होणारा हा अशाप्रकारचा देशातील पहिला प्रकल्प ठरणार आहे. या प्रकल्पाचे भूमिपूजन शनिवारी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या हस्ते मुनावळे येथे संपन्न होणार आहे.
बांबू लागवड व रेशीम उत्पादनास प्रोत्साहन
तसेच मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बांबू लागवडीस व रेशीम उत्पादन वाढीस प्रोत्साहन देण्यासाठी महाबळेश्वर तालुक्यातील मौजे दरे तर्फ तांब येथे बांबू मूल्यवर्धन केंद्र आणि टसर रेशीम शाश्वत रोजगार व वनसंवर्धन प्रकल्प साकारण्यात आला आहे. शेतकरी, तसेच महिला व युवकांना कृषी व वनउपज उत्पादनासाठी पूरक रोजगार संधी मिळवून देणाऱ्या या दोन्ही प्रकल्पांचे लोकार्पण शनिवारी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
पाटणमधील आठ गावांतील दरडग्रस्त कुटुंबांचे कायमस्वरूपी पुनर्वसन
याशिवाय पाटण तालुक्यात १० नोव्हेंबर २०२२ रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे आंबेघर (खालचे, वरचे), ढोकावळे, मिरगाव, हुंबरळी, शिद्रुकवाडी, जितकरवाडी आणि काहीर या आठ भूस्खलनबाधित गावांच्या कायमस्वरूपी पुनर्वसनास पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या पाठपुराव्याने प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. या पुनर्वसनासाठी आवश्यक भूसंपादन करण्यासाठी मुख्यमंत्री सहायता निधीतून ३ कोटी ८८ लाख रुपये इतका निधी मंजूर करण्यात आला आहे. आठ गावांतील ४९९ कुटुंबांचे यामुळे कायमस्वरूपी पुनर्वसन होणार असून पुनर्वसित ठिकाणी अंतर्गत रस्ते, पिण्यासाठी स्वच्छ पाणीपुरवठा, ग्रामपंचायत कार्यालय, सार्वजनिक शौचालय, वैयक्तिक एकल विद्युत जोडणी, अंगणवाडी, खेळाचे मैदान, समाजमंदिर इत्यादी नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. या सर्व कामांसाठी एमएमआरडीए १६० कोटी रुपये निधी खर्च करणार आहे. या पुनर्वसन प्रकल्पाचे भूमिपूजन शनिवारी पाटण तालुक्यातील मौजे धावडे येथे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या हस्ते होणार आहे.
डोंगरी तालुक्यांच्या सर्वांगीण विकासासाठी मुख्यमंत्री आग्रही
सातारा जिल्ह्यातील डोंगरी तालुक्यांच्या विकासाच्या दृष्टीने मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध प्रकल्पांना गती दिली जात आहे. मुनावळे येथे होणाऱ्या जलपर्यटन प्रकल्पामुळे सुमारे ५ हजार रोजगार संधी उपलब्ध होतील, तसेच येथील पर्यटनाला चालना मिळणार आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होण्याच्या दृष्टीने बांबू लागवड आणि जंगल रेशीम उत्पादनास प्रोत्साहन देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आग्रही आहेत. त्यांच्या संकल्पनेतून दरे येथे बांबू लागवड व त्यावर आधारित उत्पादने, तसेच ऐन वृक्षाच्या आधारे टसर रेशीम उत्पादनाकरिता प्रशिक्षण व बाजारपेठ उपलब्ध करून देणारे प्रकल्प दरे येथे उभारण्यात आले आहेत. या प्रकल्पांमुळे स्थानिकांना निश्चितच कृषीपूरक रोजगार उपलब्ध होतील, असा विश्वास पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी व्यक्त केला आहे. तसेच पाटणमधील दरडग्रस्त कुटुंबांच्या कायमस्वरूपी पुनर्वसनासाठी आम्ही प्रयत्नशील होतो. मुख्यमंत्री सहायता निधीतून तसेच एमएमआरडीएच्या माध्यमातून सुमारे १६४ कोटी रुपये या पुनर्वसन प्रकल्पाकरिता निधी उपलब्ध करून देण्यात आला असून एमएमआरडीएच्या माध्यमातून हा पुनर्वसन प्रकल्प पूर्णत्वास नेण्यात येणार आहे. दरडग्रस्त कुटुंबांना सर्व सोयीसुविधांनी युक्त अशा ठिकाणी हक्काचा निवारा उपलब्ध करून देता येईल, याचे समाधान असल्याची भावना पालकमंत्री शंभूराज देसाई व्यक्त केली आहे. तसेच सातारा जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सदैव कटिबद्ध आहोत, असा विश्वासही पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी व्यक्त केला आहे.