उद्योग स्नेही धोरणामुळे जागतिक गुंतवणूकदारांसाठी महाराष्ट्र पसंतीचे राज्य – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि.७ : उद्योग स्नेही धोरणामुळे जागतिक गुंतवणूकदारांसाठी महाराष्ट्र हे पसंतीचे राज्य ठरले आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

मुंबई येथे जपानच्या इशिकावा येथील उद्योजकांच्या शिष्टमंडळासोबत आयोजित बैठकीत ते बोलत होते. बैठकीस उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे, सचिव डॉ. श्रीकर परदेशी, चौदा सदस्यीय शिष्टमंडळाचे अध्यक्ष यामामोटो हिरोशी, उद्योग विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, राज्यात उद्योगाला पोषक वातावरण तयार झाले आहे. जपान येथील उद्योजकांच्या गुंतवणूक सोयीसाठी विशेष कक्ष स्थापन केला आहे. महाराष्ट्र देशात विदेशी गुंतवणुकीत प्रथम स्थानी आहे. कर्नाटक, गुजरात, दिल्ली या तीन राज्याच्या एकत्रित विदेशी गुंतवणुकीपेक्षा जास्त गुंतवणूक महाराष्ट्रात झाली आहे, असे उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉ.कांबळे यांनी यापूर्वी महाराष्ट्राच्या ओद्योगिक क्षमतेबाबत सादरीकरण करून माहिती दिली. उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते जपानी शिष्टमंडळातील सर्व सदस्यांचे शाल आणि बोधिसत्व यांची प्रतिमा देऊन स्वागत करण्यात आले.

शिष्टमंडळाचे प्रमुख श्री. यामा मोटो यांनी सुरुवातीस शिष्टमंडळातील सदस्यांचा परिचय करून दिला तसेच इशिकावा येथील पर्यटन व उद्योगातील विकासाबाबतची माहिती दिली.

००००

किरण वाघ/विसंअ