मनोरंजन विश्वाच्या समस्या सोडविण्यासाठी राज्य शासन सकारात्मक – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, दि. ७ : मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीसमोर काही आव्हाने असली तरी मनोरंजन विश्वाच्या सर्व समस्या सोडविण्यासाठी राज्य शासन सकारात्मक आहे. मुंबईतील चित्रनगरीचे मेकओव्हर राज्य शासन करणार आहे, जगाला हेवा वाटेल अशी चित्रनगरी आपण करू. चित्रपट ही मोठी इंडस्ट्री आहे, महाराष्ट्रातील कलाकार संस्कृती पुढे नेण्याचं काम करीत असल्याने सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

महाराष्ट्र टाइम्सच्या वतीने ‘मटा सन्मान २०२४’ पुरस्कार प्रदान सोहळा विले पार्ले येथील मुकेश पटेल सभागृह येथे आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महाराष्ट्र टाइम्सचे समूह संपादक पराग करंदीकर यांची यावेळी व्यासपीठावर उपस्थिती होती

मुख्यमंत्री श्री. शिंदे आणि उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते मटा सन्मान महाराष्ट्र भूषण पुरस्कार ज्येष्ठ गायिका पद्मभूषण सुमन कल्याणपूर यांना, वसुंधरा साथी सन्मान पुरस्कार बीजमाता राहीबाई पोपेरे यांना आणि युथ आयकॉन सन्मान शास्त्रीय गायक महेश काळे यांना प्रदान करण्यात आला.

यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, महाराष्ट्र टाइम्स सतत २४ वर्षे उत्कृष्ट कलाकृतींचा आणि गुणवंत कलावंतांचा गौरव करत आहे. ही अभिनंदनीय गोष्ट आहे. पत्रकारितेमध्ये ६-७ दशकांहून अधिक काळ कार्यरत असलेल्या मटाने मराठी वाचकांच्या मनात हक्काचे स्थान निर्माण केले आहे. विविध उपक्रमातून महाराष्ट्राच्या सामाजिक, सांस्कृतिक प्रगतीत म.टा. ने महत्त्वाचे योगदान दिल्याचे त्यांनी सांगितले.

 

या सोहळ्यात सुमनताईंना महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार देण्याचे भाग्य आम्हा दोघांना लाभले, असे सांगून मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, सुमनताईंच्या आवाजात आपण अनेक सुमधुर गाणी ऐकली. त्यांची गाणी आणखी हजारे वर्षे अशीच ताजीतवानी वाटणार आहेत. तसेच तरुण पिढीपर्यंत भारतीय शास्त्रीय संगीत पोहोचवण्यात महेश काळे यांचे मोठे योगदान आहे.       केवळ भारतातच नव्हे तर विदेशातही ते शास्त्रीय संगीताचा प्रसार करून खऱ्या अर्थाने  कला संस्कृतीच्या श्रेष्ठत्वाचे दूत बनले आहेत, अशा शब्दात त्यांनी महेश काळे यांचा गौरव केला.

ते म्हणाले, राहीबाई पोपेरे यांना ‘वसुंधरा साथी सन्मान’ दिला आहे. हा पुरस्कार महाराष्ट्र टाइम्स आणि महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळातर्फे दिला जातो. पर्यावरण जागृतीसाठी व्यासपीठ म.टा.ने उपलब्ध करून दिले. बीजमाता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राहीबाई यांचं कर्तृत्व मोठं आहे. त्यांनी हायब्रिडविरुद्ध लढा उभारला आणि देशी बियाण्यांचा प्रसार केला. कोणतीही शैक्षणिक पदवी नसली तरी त्या सगळ्यांना डिग्री देणाऱ्या ठरल्या आहात, अशा शब्दात त्यांनी राहीबाईंचे कौतुक केले.

राहीबाई यांनी विषमुक्त शेतीसाठी जे काम सुरू केले आहे त्यासाठी शासन त्यांच्याबरोबर आहे. राज्य सरकारने १२१ सिंचन प्रकल्पांना मान्यता दिली आहे. १५ लाख हेक्टर जमीन ओलिताखाली येणार आहे, अशी माहितीही यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी दिली.

विष मुक्त शेती अभियान राज्यात सुरु सुरांच्या दोन पिढ्यांचा आज सन्मान

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मटा सन्मान पुरस्कार देऊन आम्ही सन्मानित झालो ही भावना मनामध्ये आहे. बीजमाता राहीबाई यांचे काम ही सर्वात मोठी सेवा आहे. आपण सध्या जल वायू प्रदूषणामुळे आरोग्य विषयक प्रश्नांना सामोरे जात आहोत. कॅन्सर रुग्ण वाढत आहेत. विषयुक्त अन्न हे याचे मूळ कारण आहे. ते दूर करण्यासाठी राहीबाई प्रयत्न करत आहेत. त्यासाठी जनजागृतीचे काम त्या करत आहेत.

राज्य शासनाने विषमुक्त शेती मिशन सुरू केले आहे. राज्यातील २५ लाख हेक्टर शेती विषमुक्त करण्याचे उद्दिष्ट्य आपण ठेवले आहे. यासाठी काम सुरू झाले असल्याची माहिती श्री. फडणवीस यांनी दिली.

आजच्या मटा सन्मान सोहळ्यात सुरांच्या दोन पिढ्यांचा सन्मान आज केला  गेला आहे, असे सांगून उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, सुमनताई यांची गाणी अजरामर आहेत. त्यांनी १३ विविध भाषेत गाणी गायली. देवघरात तेवणारा दिवा त्याप्रमाणे सुमनताईंचे गाणे असल्याचे ते म्हणाले. महेश काळे यांनी अभिजात संगीताच्या माध्यमातून  नवीन पिढीला शास्त्रीय संगीताचे वेड लावले. जगातील वेगवेगळ्या देशात हे संगीत नेले, असे कौतुकोद्गार त्यांनी काढले.

यावेळी पुरस्कारार्थीनीही मनोगत व्यक्त केले. पुरस्कार मिळाल्याबद्दल सुमन कल्याणपूर यांनी कृतार्थतेची भावना व्यक्त केली. गेली सत्तर दशके गायन करताना प्रत्येक वेळी रसिकांचे प्रेम मिळाले. राहीबाई यांनीही आपण निसर्गाच्या शाळेत शिकलो आणि विषमुक्त अन्नासाठी आपण काम करत आहोत. सेंद्रिय शेती ही काळाची गरज असल्याचे सांगितले. तर, महेश काळे यांनी, अभिजात संगीत जगाच्या पाठीवर वेगवेगळ्या देशात नेऊन त्याच्या प्रसाराचे काम करण्यास या पुरस्काराने आणखी बळ मिळेल, असे सांगितले.

यावेळी नाट्य चित्र क्षेत्रातील कलावंत, तंत्रज्ञ यांनाही पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

०००

दीपक चव्हाण/विसंअ