शेतकऱ्यांना त्रास होईल असा प्रकल्प  जिल्ह्यात येणार नाही – पालकमंत्री उदय सामंत 

रायगड जिमाका दि 7–रायगड जिल्ह्याचा औद्योगिक दृष्टीने तसेच सर्वांगीण विकास करतांना शेतकऱ्यांना त्रास होईल असा कुठलाही प्रकल्प रायगड जिल्ह्यात येणार नाही, असे आश्वासन उद्योग मंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत यांनी दिले.
पनवेल औद्योगिक वसाहत येथे महाराष्ट्र शासनाच्या उद्योग विभागांतर्गत पायाभूत सुविधा विकास योजनेंतर्गत रस्ते, गटारे, ड्रेनेज आणि पाणी पुरवठा व्यवस्था या सुविधांच्या विकास कामाचा शुभारंभ पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.
व्यासपीठावर खा. श्रीरंग बारणे, आ. प्रशांत ठाकूर, जिल्हाधिकारी किशन जावळे, पनवेल वसाहतीचे चेअरमन विजय लोखंडे, उपाध्यक्ष सुषमा पुरोहित यांसह विविध पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी बोलतांना पालकमंत्री श्री सामंत म्हणाले  महाराष्ट्राच्या आर्थिक जडणघडणीत उद्योजकांचा महत्वाचा वाटा आहे. राज्यात गुंतवणूक परिषदेच्या माध्यमातून यावर्षी 1 लाख कोटींची स्थानिक गुंतवणूक  झाली आहे. राज्य शासनाने उद्योजकांना सर्वोतपरी सहकार्य करण्याचे धोरण स्वीकारले आहे.  त्यांच्यावर अन्याय होणार नाही याची दक्षता घेण्यात येत आहे. तसेच केंद्र शासनाने अलीकडे केलेल्या कायद्याचा उद्योजकांना निश्चित फायदा होईल. माथाडी कामगारांच्या समस्या सोडविण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे.
पनवेल ची ही सर्वाधिक जुनी औद्योगिक वसाहत आहे. येथील सोयी सुविधासाठी, विकास कामांसाठी 15 कोटी मंजूर केले आहेत. या वसाहतीच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी लवकरच  बैठक घेण्यात येईल असेही पालकमंत्री यांनी यावेळी सांगितले.
यावेळी आ प्रशांत ठाकूर यांनी या परिसरातील प्रश्न मांडले. पनवेल वसाहतीचे अध्यक्ष विजय लोखंडे यांनी प्रास्तविक केले.