कोल्हापूर दि. ८ (जिमाका) : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर वास्तव्य करीत असलेली लंडनमधील वास्तू शासनाने आपल्याकडे घेतल्याचा अभिमान आहे, त्याचीच प्रतिकृती माणगाव येथे साकार करण्यात आली आहे. राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची ऐतिहासिक माणगाव परिषद येथेच झाली होती. या दोघांचे संयुक्त स्मारक माणगाव येथे उभारण्याचा आपला संकल्प असून त्यासाठी १९९ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
माणगाव येथील माणगाव परिषदेच्या १५ ठरावांच्या शिलालेखाचे उद्घाटन, होलाग्राफिक शो व माणगाव येथे साकारलेल्या लंडन हाऊस प्रतिकृती इमारत लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पार पडला. याप्रसंगी पालकमंत्री हसन मुश्रीफ, विधान परिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे, खासदार धनंजय महाडिक,खासदार धैर्यशील माने, खासदार संजय मंडलीक, आमदार राजबाबा आवळे, आमदार प्रकाश आवाडे, राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षिरसागर, जिल्हाधिकारी अमोल येडगे, महापालिका आयुक्त के.मंजुलक्षी, माणगावचे सरपंच राजू मगदूम आदी मान्यवर उपस्थित होते.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, छत्रपती शाहू महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या माणगाव येथील संयुक्त स्मारकाबरोबरच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे इंदू मिल मुंबई येथील स्मारकही संपूर्ण जगाला हेवा वाटेल अशा पद्धतीने करणार असल्याचे सांगितले. राजर्षी शाहू महाराज हे एक महान समाज सुधारक होते. शिक्षण आणि नोकरीत बहुजनांना आरक्षण देणारे व शिक्षणासाठी वसतिगृहाची उभारणी करणारे ते पहिले राजे होते. तर बहिष्कृत समाजाला स्वाभिमानाची आणि स्वत:ची जाणीव करुन त्यांचा उद्धार करणारे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर होते. डॉ. आंबेडकरांनी शाहू महाराजांच्या उपस्थितीत जगातील पहिली बहिष्कृत वर्गाची ऐतिहासिक माणगाव परिषद घेतली त्यामुळे ही पावन भूमी आहे. या भूमीला मी वंदन करतो.
माणगाव येथे साकारण्यात आलेला होलोग्राफिक शो पाहताना राजर्षी छत्रपती शाहू महाराज व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रत्यक्ष आपल्याशी बोलत आहेत असे दुर्मिळ क्षण आपल्याला पाहावयास मिळत आहे, हे आपल्या सर्वांचे भाग्य असल्याचे सांगून मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, या ठिकाणी राजर्षी शाहू महाराजांचे शब्द लिहीले आहेत की तुम्ही योग्य नेता निवडला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची देशभक्ती, राष्ट्रभक्ती लोकांच्या मनातील भावना लक्षात घेवून ते हिंदुस्थानचे नेतृत्व करु शकता. त्यांना राजाश्रय देण्याचे काम राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी केले होते, असेही त्यांनी सांगितले.
केंद्र व राज्य शासनही गोरगरीब जनतेच्या कल्याणासाठी अनेक यांना राबवित आहे. समाजातील प्रत्येक घटकाच्या उन्नतीसाठी कल्याणकारी योजना सुरु आहेत. यामधून कष्टकरी, कामगार,महिला, तरुण युवा वर्गासह सर्वांनाच विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. शासन बार्टी, सारथी, महाज्योती, आदिवासी संशोधन प्रशिक्षण संस्था सक्षमपणे समाजाच्या उध्दारासाठी काम करीत आहे. असे सांगून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महिला दिन व महाशिवरात्री निमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजर्षी छत्रपती शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर व क्रांतीकारी आण्णासाहेब पाटील यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
०००