सांस्कृतिक कार्य विभागातर्फे उद्या नवी दिल्लीत ‘शिवजागर’ सांस्कृतिक कार्यक्रम

0
8

मुंबई दि. ८ :  छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या ३५० व्या वर्षानिमित्त  सांस्कृतिक कार्य संचालनालयाने नवी दिल्ली येथे ‘शिवजागर : साद सह्याद्रीची’ या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. शनिवार, दि. ९ मार्च रोजी सायंकाळी ६ वाजता सिरी फोर्ट ऑडिटोरियम येथे होणाऱ्या या कार्यक्रमात तब्बल २०० कलाकार आपल्या सादरीकरणातून छत्रपती शिवरायांचा गौरवशाली इतिहास मांडणार आहेत.

राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनातून हा कार्यक्रम  होत आहे. सांस्कृतिक कार्य संचालनालयाने या कार्यक्रमाचे आयोजन केले असून विवेक व्यासपीठाने कार्यक्रमाचे संयोजन केले आहे. या कार्यक्रमात गीतगायन, नृत्य, सामूहिक नृत्य, पोवाडा व लोककला सादरीकरण, चित्रकला, रांगोळी, शिवकालीन साहसी क्रीडाप्रकारांचे सादरीकरण अशा विविध प्रकारचे कलात्मक सादरीकरणाचा समावेश असणार आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून महाराष्ट्राची लोकसंस्कृती, लोप पावत चाललेल्या अनेक लोककलांचे दर्शन ‘महाराष्ट्राची लोकसंस्कृती’ या भागातून तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनचरित्राचा इतिहास ‘शिवपर्व’ या भागातून मांडला जाणार आहे.

या कार्यक्रमाबाबत सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, “या कार्यक्रमाच्या माध्यमातून महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या गौरवशाली इतिहासाचा जागर देशाच्या राजधानीत होत आहे. शिवराज्याभिषेकाच्या ३५० व्या वर्षानिमित्त शासनाने राज्यात, देशातच नव्हे तर जगभर विविध कार्यक्रम केले आहेत. या ‘शिवजागर’ कार्यक्रमात छत्रपती शिवरायांचा ऐतिहासिक, पराक्रमी वारसा उपस्थितांना अनुभवता येणार आहे.

नवी दिल्ली येथील कार्यक्रमातून छत्रपती शिवरायांचा इतिहास उलगडला जाणार असल्याने अधिकाधिक शिवप्रेमी नागरिकांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावे, असे आवाहन सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिन विकास खारगे व सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक विभीषण चवरे यांनी केले आहे.

०००

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here