मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा गौरव पुरस्कार प्रदान समारंभावर आधारित विशेष कार्यक्रम उद्या सह्याद्री वाहिनीवर

मुंबई, दि. ९ – महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागामार्फत ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ अभियान नुकतेच राज्यात राबविण्यात आले. या अभियानातील विजेत्या शाळांचा गौरव पुरस्कार प्रदान समारंभ मुंबईत ५ मार्च रोजी आयोजित करण्यात आला होता. या समारंभावर आधारित विशेष कार्यक्रम मुंबई दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर रविवार दिनांक १० मार्च २०२४ रोजी दुपारी ३ वाजता पाहायला मिळणार आहे.

शिक्षण क्षेत्राला नवचेतना देणाऱ्या या अभियानात एक लाख तीन हजार शाळांमधून सुमारे दोन कोटी विद्यार्थी सहभागी झाले होते. देशाच्या महासत्ता होण्याच्या वाटचालीत महाराष्ट्राच्या शिक्षण क्षेत्राचा मोलाचा वाटा असेल असे अभिमानाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या अभियानाच्या पारितोषिक वितरण सोहळ्यात नमूद केले. तर अभियानातील तीन उपक्रमांची गिनीज बुक मध्ये नोंद झाल्याचे जाहीर करून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड तर्फे प्रमाणपत्रे देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे या कार्यक्रमात सुपूर्त करण्यात आली.

राज्य तसेच विभागीय पातळीवर पारितोषिक पटकावलेल्या शाळांचा मुख्यमंत्री आणि मान्यवरांच्या हस्ते या कार्यक्रमात सन्मान करण्यात आला. या संपूर्ण सोहळ्यावर आधारित असलेला वैष्णो व्हिजन निर्मित आणि जयू भाटकर दिग्दर्शित हा विशेष कार्यक्रम रविवार दि. १० मार्च २०२४ रोजी दुपारी ३ वाजता दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर प्रसारित केला जाणार आहे.

०००