पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते नवीन प्रशासकीय इमारतीचे भूमिपूजन

अमरावती, दि. ९ (जिमाका): उच्च व तंत्र शिक्षण, वस्त्रोद्योग, संसदीय कार्ये मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी जिल्हा परिषदेच्या नवीन प्रशासकीय इमारतीचे भूमिपूजन आणि महिला व बालविकास भवन इमारतीच्या कोनशिलेचे अनावरण करून लोकार्पण केले.

खासदार डॉ. अनिल बोंडे, आमदार प्रवीण पोटे-पाटील, आमदार रवी राणा यांच्यासह मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता मोहपात्रा, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी, महिला व बाल विकास विभागाचे उपायुक्त विलास मरसाळे, पोलीस उपायुक्त सागर पाटील, जिल्हा परिषद महिला व बाल विकास अधिकारी डॉ. कैलास घोडके, महिला आर्थिक विकास महामंडळचे जिल्हा समन्वय सुनिल सोसे आदी यावेळी उपस्थित होते.

महिला व बालविकास भवन इमारतीच्या बांधकामासाठी सुमारे 4 कोटी 25 लक्ष रुपये खर्च करण्यात आले असून अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने इमारतीचे बांधकाम करण्यात आले आहे. ही इमारत दुमजली असून तळ मजल्याचे क्षेत्रफळ 477 चौ.मि. व दुसऱ्या मजल्याचे क्षेत्रफळ 445 चौ.मि. असे एकूण 922 चौरस मीटर आहे. या इमारतीमध्ये उपायुक्त महिला व बाल विकास विभाग, जिल्हा महिला व बालविकास कार्यालय, जिल्हा परिषदचे महिला व बालविकास, राज्य महिला आयोगाच्या कार्यालयाचे प्रतिनिधी व महिला आर्थिक विकास मंडळ यांचा समावेश असणार आहे.

जिल्हा परिषदेच्या नवीन प्रशासकीय इमारतीच्या बांधकामासाठी सुमारे 49 कोटी 83 लक्ष रुपये खर्च  नियोजित असून तळमजल्यासह पाच मजले असणार आहे. त्यामध्ये पार्कींग फ्लोअर 2 हजार 433.32 चौ. मी., पहिला, दुसरा व तिसरा मजला प्रत्येकी 2 हजार 572.49 चौ. मी. तर चौथा मजला 1 हजार 775.27 चौ. मी. असे एकूण 14 हजार 196.58 चौरस मीटर क्षेत्र बांधकाम प्रस्तावित आहेत. नवीन प्रशासकीय इमारतीसाठी प्रस्तावित जागा 29 हजार 592.92 चौरस मीटर  उपलब्ध करुन देण्यात आली आहे. या इमारतीमध्ये शिक्षण विभाग, पंचायत विभाग, सामान्य प्रशासन विभाग, महिला व बालकल्याण विभाग, आरोग्य विभाग, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, लेखा विभाग, बांधकाम विभाग, ग्रामीण पाणी पुरवठा विभाग,कृषी विभाग, मृद व जलसंधारण विभाग, मनरेगा विभाग, भुजल सर्वेक्षण विभाग, पाणी व स्वच्छता मिशन विभाग, पुशसंवर्धन विभाग, समाजकल्याण विभाग असे एकूण 16 व सर्व पदाधिकाऱ्यांच्या कक्षाचा समावेश या इमारतीमध्ये करण्यात आला आहे.

०००