मोहपाडा ते देवळाचा पाडा पुलाने जोडला जाणार

नाशिक, दि. १२ (जिमाका) : पेठ तालुक्यातील मोहपाडा व देवळाचा पाडा हे दोन पाडे जोडणाऱ्या  दमणगंगा नदीवरील मोठ्या पुलाचे भूमिपूजन सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते आज पार पडले. कहांडोळपाडा येथे झालेल्या या कार्यक्रमास विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, खासदार श्रीकांत शिंदे, आमदार सुहास कांदे, माजी आमदार धनराज महाले, सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभागाचे मुख्य अभियंता प्रशांत औटी, सार्वजनिक बांधकाम अधीक्षक अभियंता अरुंधती शर्मा, कार्यकारी अभियंता राहुल पाटील, सरपंच तुळशीराम भांगरे यांच्यासह अधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

येथील दुर्गम भागातील मुलांना शाळेत जाण्याकरिता नदी पार करावी लागत असे. प्रसंगी पालकांना मुलांना पातेल्यात बसवून व खांद्यावर घेवून नदी पार करावी लागत होती. यासंदर्भात सोशल मीडियावरील एका व्हिडिओची दखल घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रयत्नातून येथे भरीव पूल साकारण्यासाठी रू. ११ कोटी, ५३ लाखांचा निधी मंजूर करण्यात आला. पावसाळ्यात दमणगंगा नदीच्या पाण्यामुळे दोन पाड्यांचा तुटणारा संपर्क हा या पुलाच्या माध्यमातून कायमस्वरूपी जोडला जाणार आहे. एक वर्षाच्या आत या पुलाचे बांधकाम पूर्ण होवून हा ग्रामस्थांसाठी खुला होणार आहे.

पालकमंत्री दादाजी भुसे यांनी यावेळी विद्यार्थ्यांची पाठ थोपटून मुलांची शिक्षणासाठी असलेली ओढ, जिद्द यांचे कौतुक केले. तसेच, ग्रामस्थांच्या अडचणी सोडविण्यासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही यावेळी खासदार श्रीकांत शिंदे यांनी दिली.

०००