पांढरी खानमपूर आंदोलन; विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय यांच्याकडून जखमींची विचारपूस

अमरावती, दि.१२ : विभागीय आयुक्त कार्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ सोमवारी (दि. ११ मार्च) पांढरी खानमपूर येथील ग्रामस्थांच्या ठिय्या आंदोलनात जखमी झालेल्यांची विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय यांनी आज रेडियंट हॉस्पीटलला भेट देवून आस्थेने विचारपूस केली. जखमींना आवश्यक त्या सर्व वैद्यकीय सुविधा पुरवाव्यात, अशा सूचना त्यांनी रुग्णालयाला दिल्या.

यावेळी त्यांच्यासोबत पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी व आरोग्य अधिकारी उपस्थित होते. अंजनगाव सुर्जी तालुक्यातील पांढरी खानमपूर येथील प्रवेशद्वाराला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्याच्या मागणीसाठी अंजनगाव सुर्जी तालुक्यातील पांढरी खानमपूर येथील ग्रामस्थांचे गत तीन दिवसापासून विभागीय आयुक्त कार्यालयावर ठिय्याआंदोलन सुरु होते. सोमवारी सायंकाळी आंदोलनाला हिंसक वळण लागले. जिल्हा प्रशासनाचा संयुक्त बैठकीचा प्रस्ताव आंदोलकांनी अमान्य करुन जमावाने पोलिसांवर दगडफेक केली. आंदोलकांनी विभागीय आयुक्त कार्यालयाच्या गेटचे नुकसान केले. पोलीस वाहनांची तोडफोड केली. त्यामुळे जमावाला पांगविण्यासाठी पोलीसांनी अश्रूधुरांच्या नळकांड्या फोडल्या, पाण्याचा मारा केला. दरम्यान, नऊ पोलीस कर्मचारी, अग्निशमन दलाचे दोन जवान व पाच आंदोलक असे १६ जण जखमी झाल्याची माहिती आहे. त्या जखमींची आज विभागीय आयुक्तांनी भेट घेऊन प्रकृतीविषयी आस्थेने विचारपूस केली.

कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी शहरात व विभागीय आयुक्त परिसरात पोलीस जवानांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. सद्यस्थितीत परिस्थिती पूर्णत: नियंत्रणात आहे. तसेच उक्त प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एक सदस्यीय समिती गठीत करण्यात आली असून तीन दिवसांत चौकशी अहवाल सादर करण्याचे निर्देश विभागीय आयुक्तांनी समितीला दिले आहे.

०००