मुंबादेवी, महालक्ष्मी मंदिर परिसर विकासासाठी २८० कोटी; जगन्नाथ शंकरशेठ स्मारकासाठी ३५ कोटी रुपयांचा निधी

0
5

मुंबई, दि. १३: मुंबई शहरातील मुंबादेवी मंदिर, महालक्ष्मी मंदिर, हाजीअली दर्गा, जगन्नाथ शंकरशेठ स्मारक व भागोजी शेठ कीर स्मारकाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यावेळी महालक्ष्मी मंदिर परिसर विकासासाठी मुंबई महापालिकेने ६० कोटी रुपयांचा निधी देण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. तर मुंबादेवी मंदीर सौंदर्यीकरणासाठी २२० कोटी, जगन्नाथ शंकरशेठ स्मारकासाठी ३५ कोटी तर भागोजी शेठ कीर स्मारकासाठी २० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून द्यावा, असा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.

सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या आढावा बैठकीस विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, मुंबई शहरचे पालकमंत्री दीपक केसरकर, मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा, खासदार राहुल शेवाळे, आमदार सदा सरवणकर, मुंबई महापालिका आयुक्त आय एस चहल, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव असीम गुप्ता, अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी, नाना शंकरशेठ यांच्या कुटुंबातील विलास शंकरशेट, जिमी शंकरशेठ आणि पद्मिनी शेठ आदी उपस्थित होते.

मुंबईतील महालक्ष्मी, मुंबादेवी, हाजी अली प्राचीन देवस्थान आहेत. त्यांच्या सौंदर्यीकरणासाठी आवश्यक तो निधी उपलब्ध करून देतानाच भाविकांना सुलभ दर्शनासाठी सोयीसुविधा करण्यात याव्यात. महालक्ष्मी, मुंबादेवी मंदिराचा विकास करताना परिसरातील मंदिरांचे देखील सौंदर्यीकरण करावे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. मंदिर परिसरात वाहनतळाची सोय करताना त्याच ठिकाणी स्वच्छतागृहांची देखील व्यवस्था करावी. मंदिरांचे सौंदर्यीकरण करतानाच प्राचीन स्थापत्य शैलीचा देखील वापर करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या.

यावेळी महालक्ष्मी मंदिर, मुंबा देवी मंदिर, हाजीअली दर्गा, जगन्नाथ शंकरशेठ स्मारक व भागोजी शेठ कीर स्मारकाच्या कामांचे सादरीकरण करण्यात आले. जगन्नाथ शंकरशेठ स्मारक वडाळा येथे करण्यात येत असून मुंबई महापिलेकने तातडीने ३५ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून द्यावा आणि स्मारकाचे काम वर्षभरात पूर्ण करावे, असे मुख्यमंत्र्यांनी महापालिकेला सांगितले.

००००

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here