पाणीपुरवठा सेवा विषयक तक्रारींच्या निवारणासाठी ॲप्लिकेशन व वेब पोर्टलमुळे शासन व जनता अधिक जवळ आले – मंत्री गुलाबराव पाटील

0
14

मुंबई, दि. 13 : नागरिकांच्या तक्रारी सोडविण्यासाठी सुरुवात होणाऱ्या मोबाईल ॲप्लिकेशन व वेब पोर्टलच्या  शुभारंभामुळे शासन व जनता अधिक जवळ आले असून नागरिकांच्या तक्रारींची वेळेत सोडवणूक होण्यासाठी हे महत्त्वाचे पाऊल आहे , असे प्रतिपादन पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.

मुंबई येथे पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग अंतर्गत महाराष्ट्र राज्य आणि पाणी व स्वच्छता मिशनच्यावतीने ग्रामीण भागातील नागरिकांना वेब पोर्टल व मोबाईल ॲप्लिकेशनचे अनावरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमास विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारे, मिशन संचालक डॉ. अनिल सैनी, अतिरिक्त मिशन संचालक श्रीमती सातपुते, अमन मित्तल, केपीएमजीचे राहुलकुमार यासह विविध अधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमासाठी सर्व जिल्ह्यातील भूजल सर्वेक्षण विभागाचे प्रमुख अधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी उपस्थित होते.

प्रधान सचिव श्री. खंदारे म्हणाले की, राज्यातील ग्रामीण भागातील जनतेला पाणीपुरवठा सेवाविषयक भेडसावणाऱ्या समस्यांचे विहीत कालावधीत निवारण करण्यासाठी पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या पुढाकाराने सुरुवातीच्या टप्प्यात नागरिकांना वेब पोर्टल व मोबाईल अप्लिकेशनच्या सहाय्याने तक्रार नोंदविता येणार आहे.

मिशन संचालक डॉ. सैनी म्हणाले की, महा-जल समाधान सार्वजनिक तक्रार निवारण प्रणाली विकसित करण्यात आली आहे. http://mahajalsamadhan.in या वेब लिंकवर नागरिकांसाठी प्रणाली उपलब्ध करून देण्यात आली आहे.

ग्रामीण भागातील नागरिकांचे जीवनमान उंचाविण्यासाठी नळजोडणीसह पाणीपुरवठा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने केंद्र शासन पुरस्कृत जल जीवन मिशन हा महत्वाकांक्षी कार्यक्रम राबविण्यात येत असून, सद्यस्थितीत ८४.४०% कुटुंबांना नळजोडणीद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत असून सन २०२४ अखेरपर्यंत राज्यातील सर्व कुटुंबांना नळजोडणीद्वारे पाणीपुरवठा उपलब्ध करून देण्याचे उद्द‍िष्ट ठेवण्यात आले आहे.

नागरिकांना प्रणाली सहजपणे वापरता यावी या उद्देशाने मराठी व इंग्रजी या भाषांमध्ये विकसित करण्यात आली आहे. या प्रणालीचे प्रमुख फायदे म्हणजे नागरिकांना तक्रार ऑनलाईन पद्धतीने नोंदविता येणार असून तक्रार निवारणाबाबतची स्थिती मेसेज व ई-मेलच्या सहाय्याने अवगत होईल. नागरिकांना अभिप्राय सुद्धा नोंदविण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. एकंदरीतच, नागरिकांच्या समस्यांचे समाधान होऊन पाणीपुरवठा सेवा सुरळीत मिळण्यासाठी प्रणाली उपयुक्त ठरणार असून विभागाने एक सकारात्मक पाऊल टाकले आहे. नागरिकांना टोल फ्री क्रमांकाच्या माध्यमातून तक्रार नोंदविण्यासाठी विभागाच्या वतीने लवकरच सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

महा-जल समाधान सार्वजनिक तक्रार निवारण प्रणाली:

सुरुवातीच्या टप्प्यात ग्रामीण भागातील नागरिकांना वेब पोर्टल व मोबाईल ॲप्लिकेशनच्या सहाय्याने पाणी पुरवठा सेवा विषयक तक्रार नोंदविता येणार आहे.

महा-जल समाधान सार्वजनिक तक्रार निवारण प्रणालीची वैशिष्टेः नागरिकांना पाणी पुरवठा सेवा विषयक तक्रार ऑनलाईन पद्धतीने नोंदविता येणार आहे.

तक्रारीचे निवारण करण्यासाठी विभागातील संबंधित यंत्रणेच्या माध्यमातून आवश्यक उपाययोजना केल्या जावून नागरिकांची तक्रार विहित कालावधीत सोडविता येणार आहे.

तक्रार निवारण प्रणाली अंतर्गत ग्रामपंचायत स्तर, तालुका / उप विभाग स्तर व जिल्हा स्तरावरील संबंधित अधिकारी यांच्या माध्यमातून त्यांना निश्चित करण्यात आलेल्या कालावधीत तक्रार सोडविणे बंधनकारक असणार आहे.

००००

किरण वाघ/विसंअ/

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here