बारामती, दि. १४: आगामी ५० वर्षात बारामती शहराच्या लोकसंख्येत होणारी वाढ लक्षात घेऊन मैला शुद्धीकरण प्रकल्प आणि सौर ऊर्जा प्रकल्पाचा आराखडा तयार करा, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.
उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी कन्हा नदी सुशोभिकरणाअंतर्गत सुरु असलेल्या लेंढी नाला व कसबा पूल, श्रीमंत बाबूजी नाईक वाडा तसेच दशक्रिया घाट परिसरातील विविध विकास कामांची पाहणी करुन संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली.
उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले की, शहरातील नागरिकांना सर्व प्रकारच्या सोई-सुविधा उपलब्ध करुन देण्याच्या अनुषंगाने परिसरात विविध विकास कामे सुरु आहेत. कऱ्हा नदी सुशोभिकरणाअंतर्गत सुरु असलेल्या लेंढी नाला, कसबा पूल व श्रीमंत बाबुजी नाईक वाडा तसेच दशक्रिया घाट येथील विकासकामे करतांना परिसरात अधिकाधिक वृक्षारोपण करावे.
विकास कामांमुळे पाण्याच्या प्रवाहाला अडथळा निर्माण होणार नाही, याबाबत दक्षता घ्यावी. परिसरात असलेल्या वृक्षाला गोल दगडी ओटा करा.कसबा पुलाच्या खालील बाजूस पाण्याशी सुसंगत आणि परिसराला शोभेल अशी रंगरंगोटी करावी. परिसरात अनावश्यक कचरा, वेली काढून परिसरात स्वच्छता राहील , याबाबत दक्षता घ्या. सरळ वाढणारी आणि वाढल्यानंतर वरती पसरणाऱ्या विविध प्रजातीच्या वृक्षाची लागवड करा.
यावेळी अपर पोलीस अधीक्षक संजय जाधव, उप विभागीय अधिकारी वैभव नावडकर, महावितरणचे मुख्य अभियंता सुनील पावडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अनिल ढेपे, तहसीलदार गणेश शिंदे, गट विकास अधिकारी डॉ. अनिल बागल, मुख्याधिकारी महेश रोकडे, पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक संभाजी होळकर, बारामती सहकारी बँकचे अध्यक्ष सचिन सातव, माजी उपनगराध्यक्ष जय पाटील, बाळासाहेब जाधव आदी उपस्थित होते.
०००