बारामती, दि. १४: उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते सुपे येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नवीन उपबाजाराचे भूमिपूजन आणि यांत्रिक चाळणी मशीनचे लोकार्पण करण्यात आले.
यावेळी सहायक निबंधक मिलींद टाकंसाळे, पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक संभाजी होळकर, बारामती सहकारी बँकचे अध्यक्ष सचिन सातव, बारामती हायटेक टेक्सटाईल पार्कच्या अध्यक्ष सुनेत्रा पवार, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुनील पवार, उपसभापती निलेश लडकत, सचिव अरंविद जगताप, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विश्वास देवकाते आदी उपस्थित होते.
सुपे येथील नवीन उपबाजार विस्तारीकरणाकरीता शासनाची गायरान जमीन १७ एकर २३ गुंठे बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीने रुपये ७५ लाख मोबदला देऊन खरेदी केली आहे. या उपबाजाराअंर्तगत पहिल्या टप्प्यात भुसार व तेलबिया, चिंच व लिंबू या शेतमाल खरेदी विक्रीकरीता गाळे, व्यापारी गाळे, व्यावसायिक गाळे, कार्यालयीन इमारत, अंतर्गत रस्ते, सरंक्षक भिंत, पाण्याची आदी सुविधा निर्माण करण्याची कार्यवाही करण्यात येत आहे. यामुळे आगामी काळात शेतकरी व व्यापारी वर्गाला लाभ होणार आहे.
सुपे उपबाजार येथील भुसार शेतमालाची मोठ्याप्रमाणात आवक होत असल्याने शेतकरी व व्यापाऱ्याच्या मालाला चांगल्याप्रकारची ग्रेडींग मिळण्यासाठी यांत्रिक चाळणी यंत्राची उभारणी करण्यात आली आहे.
०००