शाळा परिसरातील बार व मद्य विक्रीवर कारवाई करा – राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई

0
8

मुंबई, दि. १४ : पनवेल, कल्याण, डोंबिवली या शहरांत काही ठिकाणी शाळा परिसरात बार व मद्य विक्री सुरू असल्यास संबंधीत ठिकाणी तातडीने कारवाई करण्याचे निर्देश राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी आज दिले.

मंत्रालयातील दालनात राज्य उत्पादन शुल्क मंत्री श्री. देसाई यांनी ठाणे, डोंबिवली, कल्याण व पनवेलसह रायगड येथील स्थितीचा आढावा घेतला. या बैठकीस विभागीय उपआयुक्त प्रदीप पवार, ठाणे जिल्हा अधीक्षक निलेश सांगडे, रायगड जिल्हा अधीक्षक श्री. कोल्हे उपस्थित होते.

शैक्षणिक संस्था, धार्मिक स्थळे, बस स्थानक, राष्ट्रीय महामार्गाच्या 75 मीटर अंतराच्या परिसरात हॉटेल किंवा रेस्टॉरंटमध्ये मद्य विक्रीस बंदी असल्याचा नियम आहे. या नियमांची काटेकोर अंमलबजावणी करावी. कोणत्याही परिस्थितीत बेकायदेशीरपणे मद्य विक्री होऊ देऊ नये. विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी प्रत्यक्ष स्थळावर जाऊन पाहणी करावी आणि बेकायदेशीरपणे व नियम डावलून सुरू असणाऱ्या बार व हॉटेलवर तातडीने कारवाई करावी, अशा सूचना मंत्री श्री. देसाई यांनी यावेळी दिल्या. तसेच, कामात कसूर करणाऱ्या अधिकाऱ्यांविरुद्ध कारवाई केली जाईल, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

निर्देश दिल्यानंतर तत्काळ ठाणे व रायगड जिल्ह्यात उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी प्रत्यक्ष स्थळावर जाऊन कारवाई करत असून यातून राज्य उत्पादन शुल्क मंत्री श्री. देसाई यांची कार्यतत्परता व संवेदनशीलता दिसून आली.

००००

नीलेश तायडे/विसंअ/

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here