नाशिक, दिनांक 14 मार्च, 2024 (जि. मा. का. वृत्तसेवा) : आगामी काळातील पाणीटंचाईची परिस्थिती लक्षात घेऊन पिण्याच्या पाण्याचे योग्य नियोजन करावे. तसेच सर्व विभागामार्फत करण्यात येणारी कामे वेळेत पूर्ण होण्यासाठी अधिकाऱ्यांनी आवश्यक ते नियोजन करावे, अशा सूचना राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी आज दिल्या. येवला येथे विविध विभागांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते.
संपर्क कार्यालयात आयोजित या बैठकीस येवला प्रांत अधिकारी बाबासाहेब गाढवे, जिल्हा पुरवठा अधिकारी कैलास पवार, तहसीलदार आबा महाजन, निफाड तहसिलदार विशाल नाईकवाडे, येवला नगरपालिकेचे मुख्याधिकारी किरण देशमुख, गटविकास अधिकारी महेश पाटील, गटविकास अधिकारी मच्छिंद्रनाथ धस, कार्यकारी अभियंता नांदूर मध्यमेश्वर प्रकल्प विभाग एम. बी. ढोकचोळे, उपविभागीय अभियंता पुणेगाव कालवा उपविभाग यो. अ. घुगे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
मंत्री छगन भुजबळ म्हणाले, जलस्त्रोतातील पाणीसाठा कमी झाला आहे. त्यामुळे येणाऱ्या जून २०२४ पर्यंत पिण्याच्या पाण्याचे प्राधान्याने नियोजन करणे आवश्यक आहे. सद्यस्थितीत ५१ गावे व १५ वाड्यांना टँकर्सद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे. तेथील साठवण विहिरी अधिग्रहीत करून रोटेशननुसार गावनिहाय पाणीवाटप सुरळीत कसे राहील याबाबत अधिकारी यांनी दक्ष रहावे. तसेच उपलब्ध पिण्याच्या पाणीसाठ्यातून पाण्याचा अतिरीक्त वापर शेतीसाठी होणार नाही, याबाबत योग्य दक्षता घेण्यात यावी. तसेच शासकीय टँकर्स भरण्यासाठी थ्री फेज वीजपुरवठा दिवसा सुरळीत ठेवण्यात यावा, अशा सूचना त्यांनी यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या.
मंत्री छगन भुजबळ पुढे म्हणाले, शासनाकडून प्राप्त झालेली ६३ कोटींची दुष्काळी मदत तातडीने शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात यावी. पीक विम्याच्या मदतीचे वाटप सुद्धा शेतकऱ्यांना करण्यात यावे. पुणेगाव दरसवाडी डोंगरगाव कालव्याच्या अस्तरीकरणाचे काम पावसाळ्याच्या आत पूर्ण करावे. त्यासाठी आवश्यक यंत्रसामग्री व कामगारांची संख्या वाढवून जलद गतीने काम करण्यात यावे. शिवसृष्टी प्रकल्पांतर्गत पुढील टप्प्यातील कामांसाठीचे आवश्यक ड्रॉईंग प्राप्त करून कामाला अधिक गती देण्यात यावी. रेशन कार्ड अपडेशनची प्रकरणे मार्गी लावण्यात यावीत. लासलगाव बाह्यवळण रस्त्याच्या कामासाठी १०४ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहे. त्याचे काम तातडीने पूर्ण करण्यात यावे, असे निर्देश मंत्री छगन भुजबळ यांनी बैठकीत दिले.
अडतीस गावे पाणी पुरवठा योजना, राजापूर सह ४१ गावे पाणी पुरवठा योजना, धुळगावसह १७ गावे पाणी पुरवठा योजना, लासलगावसह १६ गावे पाणी पुरवठा योजनेची सुरू असलेली कामे लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावीत. संजय गांधी निराधार योजनेचा लाभ पात्र लाभार्थींना त्वरित देण्यात यावा, अशा सूचना मंत्री श्री. भुजबळ यांनी बैठकीत दिल्या.
बैठकीत सावरगाव साठवण (ल.पा.) तलाव कामे, लासलगाव बाह्य वळण कामे, येवला शहर पिण्याच्या पाण्याची स्थिती, मनरेगा – पांदण रस्ता व इतर मंजूर कामांची सद्यस्थिती, महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान अंतर्गत येवला शहर वाढीव पाणीपुरवठा योजना, येवला शहरातील स्वच्छता आढावा बैठकीत घेण्यात आला.
एकही कुटुंब घरापासून वंचित राहणार नाही
या बैठकीत विविध घरकुल योजनांचा आढावा घेण्यात आला. समाजातील प्रत्येक पात्र वंचित घटकाला घरकुल योजनांच्या निकषात बसवून घरकुल योजनेचा लाभ देण्यात यावा. त्यांना पक्की घरे उपलब्ध करून देण्यात यावीत. यामध्ये एकही कुटुंब घरापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी, अशा सूचना मंत्री छगन भुजबळ यांनी यावेळी दिल्या.
महिला बचतगटांना व्यवसाय कर्ज धनादेश वितरण
येवला नगरपालिकेच्या माध्यमातून शासनाच्या सूक्ष्म व लघु प्रक्रिया उद्योग योजनेतून येवला शहरातील ४ महिला बचतगटांना व्यवसायासाठी अल्प व्याजदराने एकूण १७ लक्ष रुपयांच्या मंजूर कर्जाच्या धनादेशाचे वाटप मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते करण्यात आले.
00000