अंगणवाडी सेविकांकडून चांगली मुले घडविण्याचे काम – पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे

सांगली दि. 14 (जि.मा.का.) : अंगणवाडी सेविका, मदतनिस, आशा वर्कर या समाजातील महत्वाच्या घटक आहेत. अंगणवाडी सेविकांकडून चांगली मुले घडविण्याचे काम होते, असे प्रतिपादन पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी केले.

जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण विभागामार्फत धनंजय गार्डन सांगली येथे आयोजित अंगणवाडी सेविका, मदतनिस यांच्या महिला मेळाव्यात ते बोलत होते.  यावेळी खासदार संजय पाटील, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे, जिल्हा ग्रामिण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक नंदिनी घाणेकर, जिल्हा परिषद महिला व बाल कल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी संदीप यादव आदी मान्यवर उपस्थित होते.

        पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे म्हणाले, सांगली जिल्ह्यातील ग्रामीण भागातील अंगणवाड्यांमध्ये येणाऱ्या 3 ते 6 वयोगटातील बालकांसाठी जिल्हा परिषदेच्या स्वीय निधीतून 80 लाख रूपयांची तरतूद करून वयोगटनिहाय पुस्तके व वह्या छपाई करून वाटप करण्याचे काम चालू आहे. ग्रामीण भागातील 1 हजार 750 अंगणवाडी केंद्रांना वाढ सनियंत्रण साधने वजनकाटा पूरविणे ही योजना घेण्यात आली असून या योजनेस 3 कोटी 50 लाख रूपये इतक्या रक्कमेस प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. 333 अंगणवाडी केंद्रांना ऑन ग्रीड सोलार सिस्टम बसविण्यासाठी 5 कोटी रूपये रक्कमेस प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. अंकूर प्रकल्पांतर्गत थ्रीडी अंगणवाडी तयार करण्यासाठी 3 कोटी 56 लाख रूपये इतक्या रक्कमेची योजना घेण्यात आली आहे.

        ग्रामीण भागातील अंगणवाड्यातील अनुसूचित जातीतील 6 महिने ते 6 वर्षे वयोगटातीलज मुला-मुलींसाठी व किशोरवयीन मुली-मुलांसाठी, गरोदर स्तनदा माता यांना अतिरिक्त आहार पुरविणे, मल्टी मिलेट पौष्टिक बिस्किटे पुरविणे या योजनेसाठी 1 कोटी रक्कमेची प्रशासकी मान्यता देण्यात आली असल्याचे सांगून पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे म्हणाले, माझी कन्या भाग्यश्री योजनेंतर्गत 115 लाभार्थींना मार्च 2024 अखेर लाभ आदा करण्यात येत आहे. लेक लाडकी योजनेंतर्गत दिनांक 1 एप्रिल 2023 नंतर जन्मलेल्या एकूण 516 मुलींना लाभ देण्यात येत आहे. अंगणवाडी सर्वेक्षणाबाबतची संपूर्ण माहिती भरण्यासाठी तसेच अंगणवाडी केंद्रातील नाविण्यपूर्ण उपक्रमाची प्रचार व प्रसिध्दीसाठी अंगणवाडी स्तरावर तारा ॲप व युट्यूब चॅनेल उपलब्ध करून दिले असल्याचे ते यावेळी म्हणाले.

        खासदार संजय पाटील म्हणाले, अंगणवाडी सेविका, मदतनिस, आशा वर्कर यांच्याकडून समाजाची सेवा घडते. कोरोनाच्या अडचणीच्या काळातही त्यांनी अत्यंत चांगले काम करून नागरिकांना दिलासा दिला. त्यांचे  प्रश्न, अडीअडचणी सोडविण्यासाठी सदैव प्रयत्नशील राहीन, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

        जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे म्हणाल्या, अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा वर्कर नागरी, ग्रामीण भागात काम करीत असतात. गरोदर मातांना पोषण आहार देण्याचे काम अंगणवाडीमार्फत केले जाते. अंगणवाड्या सर्वंकष परिपूर्ण कशा होतील यासाठी कटिबध्द असल्याचे त्यांनी सांगितले.

प्रास्ताविक जिल्हा परिषद महिला व बाल कल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी  संदीप यादव यांनी महिला मेळावा आयोजित करण्याचा हेतू विशद केला.

यावेळी कवठेमहांकाळच्या अंगणवाडी सेविका, मदतनिस यांनी मंगळागौरी खेळ, देशिंग च्या महिलांनी विठू माऊली गाण्यावर नृत्य सादर केले.

या कार्यक्रम प्रसंगी बेटी बचाओ बेटी पढाओ या योजनेसाठी माधवनगर येथील 5 वर्षाची मुलगी राधा डावखुरे, अंकुर बाल शिक्षण योजनेसाठी तासगाव तालुक्यातील वडगाव येथील 5 वर्षाचा मुलगा पार्थ पाटील तर लेक लाडकी योजनेसाठी वाळवा तालुक्यातील  9  महिन्यांची मुलगी उर्वी पाटील यांना ब्रँड ॲम्बेसिडर म्हणून घोषीत करण्यात आले.

प्रारंभी पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे व मान्यवरांनी अंगणवाडी सेविका, मदतनिस यांच्यामार्फत बनविलेल्या विविध पौष्टीक खाद्य पदार्थांच्या लावण्यात आलेल्या स्टॉलना भेट देवून याबाबत त्यांनी महिलांचे कौतुक केले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते महिलांना विविध लाभ वाटप, तसेच  प्रातिनिधीक स्वरूपात अंगणवाडी सेविकांना मोबाईलचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमास अंगणवाडी सेविका, मदतनिस मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

00000