नायर महाविद्यालय व रूग्णालयाच्या विस्तारीत इमारतीचे लोकार्पण

मुंबई, दि. 15 : मुंबईसह राज्यातील नागरिकांचे प्रश्न सोडवून जीवनात सकारात्मक बदल घडविण्यासाठी शासन अनेक पातळ्यांवर काम करीत आहे. नागरीकांना चांगली सुविधा मिळाली पाहिजे, यासाठी विविध प्रकल्प राबविण्यात येत आहे. आवश्यक असलेल्या सोयी-सुविधांच्या निर्मितीमधून नागरिकांचे जीवन सुसह्य करण्यासाठी शासन काम करत असल्याचे, प्रतिपादन आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

नायर दंत महाविद्यालय व रूग्णालयाच्या विस्तारीत इमारतीचा लोकार्पण सोहळा नायर महाविद्यालयाच्या सभागृहात पार पडला. यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे बोलत होते. कार्यक्रमाला कौशल्य विकास, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, खासदार राहुल शेवाळे, आमदार यामिनी जाधव, महानगरपालिका आयुक्त डॉ. इकबालसिंह चहल, अति. आयुक्त सुधाकर शिंदे, अधीक्षक डॉ. नीलम अंद्राडे आदी उपस्थित होते.

नायर रूग्णालयाच्या विस्तारीत इमारतीमुळे रुग्णांना दर्जेदार आरोग्य सुविधा मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त करीत मुख्यमंत्री श्री.शिंदे म्हणाले, ही 11 मजली अगदी प्रशस्त इमारत आहे. महापालिकेची सर्व रूग्णालये आधुनिक सुविधांनी सज्ज बनविण्यात येणार आहेत. केईएम रूग्णालयात बंद पडलेल्या सहा वॉर्डांची दुरूस्ती करून हे वॉर्ड रूग्णांच्या सेवेत दाखल होण्यासाठी सज्ज आहे. यामुळे 360 खाटांची संख्या वाढली आहे.  नायर रुग्णालयाच्या इमारत बांधकामामध्ये 20 कोटी रूपयांची बचतही करण्यात आली आहे.

मुख्यमंत्री श्री.शिंदे पुढे म्हणाले, ‘झीरो प्रीस्क्रीप्शन’ पॉलीसीच्या माध्यमातून विनामूल्य औषध उपलब्ध करून देण्यात येत आहे. यासाठी 3 हजार केाटी रूपयांची तरतूद करण्यात आली आहे. औषधांसाठी एवढी मोठी तरतूद करणारी मुंबई ही जगातील पहिली महापालिका आहे. एका वर्षामध्ये आरोग्य यंत्रणेच्या बळकटीकरणासाठी 7 हजार कोटी रूपयांचा खर्च करण्यात आला आहे. दीडशे वर्षात 12 हजार  खाटा होत्या, शासनाने दीड वर्षात 5 हजार खाटांची संख्या वाढविली आहे.  महापालिकेचे  खर्चानुसार उत्पन्नही वाढले पाहिजे, त्यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी  दिल्या.

मुंबई खड्डेमुक्त करण्यात येत असल्याचे सांगत मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की,  शहरात ‘ अर्बन फॉरेस्ट’  तयार करण्यात येणार  असून सागरी किनारा मार्गाजवळ जवळपास 300 एकर जागेत जागतिक दर्जाचे ‘सेंट्रल पार्क’ तयार करण्यात येणार आहे. हा पार्क मुंबईचा ‘ऑक्सिजन पार्क’ ठरणार आहे. मुंबईत दळणावळणाची पायाभूत सोयी – सुविधांच्या विकासाची  कामे गतीने होत आहे. मेट्रो, रस्ते, अटल सेतू, सागरी किनारा प्रकल्प यामुळे मुंबई अधिक गतिमान होत आहे.  पायाभूत सोयी सुविधांच्या विकासाची 8 लाख कोटी रूपयांची कामे सुरू असलेले महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य  आहे. परकीय गुंतवणूकीतही राज्य देशात अव्वल  आहे.

मुंबई स्वच्छ करण्यासाठी सखोल स्वच्छता मोहिम राबविण्यात आली.  मुंबईचे खरे हिरो हे सफाई कर्मचारी आहे. त्यांच्या 48 निवासी वसाहती आहेत, यामध्ये नागरी सुविधांच्या विकासाची कामे करण्यात येत आहे. सध्या 2 वसाहतींमध्ये कामे सुरू झाली आहेत. सफाई कर्मचाऱ्यांच्या मुलांना उच्च शिक्षण घेण्यासाठी महापालिका त्यांचा खर्च उचलणार असल्याचेही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले. प्रास्ताविक अधिक्षक डॉ. नीलम अंद्राडे यांनी केले.   कार्यक्रमाला अधिक्षक, डॉक्टर, विद्यार्थी, कर्मचारी आदी उपस्थित होते.

००००

निलेश तायडे/विसंअ