राज्यात दोन कोटी पेक्षा जास्त महिलांना बचतगटांशी जोडण्यात येईल – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

महिला बचतगटांना एक लक्ष रुपये अनुदान लाभ हस्तांतरण

मुंबई येथे बचत गटाच्या महिलांच्या कौशल्य विकासासाठी प्रशिक्षण केंद्र

मुंबई दि. 15: बचत गटांच्या माध्यमातून होणारे काम हे महिला विकासाबरोबरच तिच्या कुटुंबासाठी देखील महत्त्वाचे ठरत आहे. राज्यात ‘उमेद’ अभियानात 60 लाख तर ‘माविम’च्या माध्यमातून 15 लाख महिला सदस्य असून दोन कोटी पेक्षा जास्त महिलांना बचत गटांशी जोडण्यात येईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. वरळी येथील आकांक्षित महिला सक्षमीकरण योजनेच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते.

नॅशनल स्पोर्टस् क्लब ऑफ इंडिया (एनएससीआय) च्या  इन्डोअर स्टेडियम मध्ये भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, रोजगार, स्वयंरोजगार व कौशल्य विकासमंत्री मंगल प्रभात लोढा, खासदार राहुल शेवाळे, आमदार सदा सरवणकर, आमदार यामिनी जाधव, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इकबाल सिंह चहल, अतिरिक्त आयुक्त सुधाकर शिंदे, शासकीय अधिकारी, लोकप्रतिनिधी आणि दहा हजार पेक्षा जास्त बचत गटांच्या महिला सदस्या उपस्थित होत्या.

याप्रसंगी दुरनियंत्रण प्रणालीद्वारे बँक खात्यात थेट लाभ हस्तांतरण करून(dbt)आकांक्षित महिला सक्षमीकरण योजनेचा शुभारंभ करण्यात आला. तसेच प्रातिनिधिकरित्या 20 महिला बचत गटाच्या सदस्या व एक ट्रान्सजेंडर बचत गट सदस्यांना लाभ हस्तांतरणाचे प्रमाणपत्र वितरण करण्यात आले.

मुख्यमंत्री श्री.शिंदे म्हणाले, महिला विविध क्षेत्रात पुरुषांच्या बरोबर काम करीत असून त्या कोठेही मागे नाहीत. अंतराळ क्षेत्रापासून, नौसेना पाणबुडी पर्यंत निर्भयतेने वावरत आहेत. महिलांमध्ये सहनशीलता, कर्तृत्व आणि नेतृत्व हे गुण सामावले असून देशाचे सर्वोच्च पद श्रीमती द्रौपदी मुर्मू या भूषवित आहेत याचे हे उदाहरणच आहे.

महिलांच्या सक्षमीकरणासाठी प्रयत्नांबाबत बोलताना मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, राज्यात महिलांच्या जीवनात बदल घडविण्यासाठी महिला विकास धोरणावर काम केले जात आहे.  मुलींसाठी 18 व्या वर्षी एक लक्ष रुपये खात्यात जमा होणारी  “लेक लाडकी योजना”, राज्य परिवहन महामंडळाचे बस प्रवास भाड्यामध्ये पन्नास टक्के सवलत दिली आहे. वर्किंग वुमन हॉस्टेल्स तयार केले.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी महिलांना विकासाच्या अनेक संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यांचे लाभ थेट त्यांच्या खात्यात पोहोचविण्यासाठी डीबीटी सुरू केले. उज्वला योजना लागू केली. केंद्र सरकारच्या धर्तीवर काम करताना राज्य महिला-भगिनींसाठी अधिकाधिक योजना राबवून न्याय देण्यासाठी काम केले जात आहे, असे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी आश्वस्त केले.

महाराष्ट्र हे पुरोगामी राज्य असून महिलांच्या सुरक्षिततेसाठी सर्व काही उपाययोजना केल्या जात आहेत, अडचणी मध्ये त्यांना तातडीने मदत मिळावी, यासाठी पोलीस व महानगरपालिका यांनी यंत्रणा उभी करावी. सीसीटीव्ही, रॅपिड रिस्पॉन्स टीम, ॲप्स व माहिती तंत्रज्ञान याचा सक्षम वापर केला जावा, असे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सूचित केले आहे. 

बचत गटाच्या महिलांना कौशल्य विकासासाठी प्रशिक्षण केंद्र

ते म्हणाले, स्वयंरोजगार करणाऱ्या महिलांच्या प्रोत्साहनासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अभिनव योजनेची सुरुवात होत आहे. महिला बचत गटांना एक लक्ष रुपये अनुदान देणारी मुंबई महानगरपालिका ही देशातील एकमेव महानगरपालिका आहे. महानगरपालिकेने अर्थसंकल्पामध्ये बचत गटांसाठी 250 कोटी रुपये तरतूद केली आहे. बचत गटाच्या महिलाना कौशल्य विकासासाठी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात प्रशिक्षण केंद्रांना जागा देण्यात येईल.

यावेळी त्यांनी मुंबईत विकासासाठी सुरू असलेल्या कामांबद्दल माहिती दिली, कोस्टल रोड टप्पा दोन, 248 स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना, मुख्यमंत्री सहायता निधीतून वैद्यकीय उपचारांसाठी मदत, मुंबई महानगरपालिका रुग्णालयांमध्ये झिरो प्रेस्क्रिप्शन पॉलिसीद्वारे सर्व औषधे विनामूल्य, मुंबई शहर स्वच्छ , सुंदर व धुळी पासून मुक्त करण्यासाठी डीप क्लीन ड्राईव्ह या उपक्रमांची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

मंत्री श्री.लोढा म्हणाले मुंबई महानगरपालिका व राज्याचा कौशल्य विकास विभाग यांच्या सहयोगाने मुंबईतील बचत गट महिलांच्या सक्षमतेसाठी महिला कौशल्य विकास विभाग सुरू करण्यात येणार आहे.

मंत्री श्री.केसरकर म्हणाले, महिलांच्या सक्षमतेसाठी अनेक प्रयत्न सुरू आहेत मुंबईतील जोगेश्वरी येथे बचत गटाच्या उत्पादन विक्रीसाठी मॉल सुरू केलेला आहे. तसेच आता राज्य शासनाकडून बचत गटांसाठी नवी मुंबई येथे देखील मोठा मॉल उभा केला जाईल.

याप्रसंगी  मुख्यमंत्री व उपस्थित मान्यवरांचे स्वागत बचत गटांनी तयार केलेल्या “तोरण, गुढी, सुवासिक अगरबत्ती व जूटची बॅग” या भेटवस्तू देऊन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अतिरिक्त आयुक्त सुधाकर शिंदे यांनी केले. खासदार शेवाळे यांनी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांना मच्छीमार परवान्यांबाबत व त्याच्या शुल्क माफी मागणीचे निवेदन सादर केले. सुरुवातीस प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा महिलांसाठी राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांच्या बाबतच्या ‘नारीशक्ती’ चित्रफितीचे सादरीकरण करण्यात आले. मुंबई महानगरपालिकेच्या वतीने महिलांच्यासाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती देण्यात आली. कार्यक्रम परिसरात महिला बचत गटांच्या वस्तूंचे प्रदर्शने ठेवण्यात आली होती.या कार्यक्रमासाठी प्रत्यक्षात दहा हजार तर ऑनलाईन 70 हजार पेक्षा अधिक महिला बचत गट सदस्य सहभागी होत्या.

०००००

किरण वाघ/विसंअ