नागरिकांच्या जीवनात बदल घडवून त्यांचे जीवन सुखी, समृध्द होण्यासाठी प्रयत्नशील -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

0
10

            ठाणे, दि.15 (जिमाका) :- शासन नेहमीच सर्वसामान्यांच्या विकासाचा विचार करीत आले आहे. नागरिकांच्या जीवनात बदल घडवून त्यांचे जीवन सुखी समृध्द होण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील आहे.  यादृष्टीने आज नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील 1 हजार 129 कोटीं रुपये मूल्य असलेल्या विविध नागरी सुविधा प्रकल्पांचे भूमिपूजन व लोकार्पण संपन्न होत आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज केले.

            नवी मुंबई महानगरपालिकेच्या तसेच सिडको महामंडळाच्या कार्यक्षेत्रातील विविध विकास कामांचे ऑनलाईन भूमीपूजन व लोकार्पण मुख्यमंत्री श्री.शिंदे यांच्या हस्ते दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे वर्षा निवासस्थान येथून संपन्न झाले, त्यावेळी ते बोलत होते.

            याप्रसंगी पालकमंत्री शंभूराज देसाई, क्रीडा व बंदरे मंत्री संजय बनसोडे, सर्वश्री आमदार रमेश पाटील, गणेश नाईक, प्रशांत ठाकूर, महेश बालदी, श्रीमती मंदा म्हात्रे, माजी खासदार संजीव नाईक, सिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल, नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त राजेश नार्वेकर, सहव्यवस्थापकीय संचालक शान्तनु गोयल, सहव्यवस्थापकीय संचालक डॉ.कैलास शिंदे, सहव्यवस्थापकीय संचालक दिलीप ढोले आदि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

            यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, नवी मुंबई महानगरपालिकेच्या विविध नागरी सुविधा प्रकल्पांचे ऑनलाईन भूमीपूजन व लोकार्पण होत आहे. हे प्रकल्प लोकोपयोगी व लोकांच्या गरजेचे आहेत. मुंबई, नवी मुंबई आता महामुंबई होत चालली आहे. तिसरी मुंबई आकाराला येत आहे. ती सर्वात मोठी मुंबई होणार आहे. शहराशहरांमधील संपर्क वाढत आहे. अटल सेतूमुळे मुंबई-ठाणे-नवी मुंबई-रायगड या शहरांमधील अंतर कमी होवून ही शहरे जवळ आली आहेत. अटल सेतू करताना पर्यावरणाची पूर्णत:काळजी घेण्यात आली आहे. फ्लेमिंगोची संख्या दुप्पट झाली आहे, यातून आपले सरकार पर्यावरण पूरक विकास अशा प्रकारचे काम करीत आहे, हे सिध्द होते.  अटल सेतू, मेट्रो, सिडकोच्या माध्यमातून विविध विकास कामे, नवी मुंबई मध्ये नवनवीन व नाविण्यपूर्ण प्रकल्प होत आहेत. हे सर्व प्रकल्प राज्याच्या विकासाच्या गेम चेंजर प्रकल्प आहेत.

      स्वच्छतेमध्ये अमृतमध्ये राज्याला पहिला क्रमांक मिळाला आहे. राज्याला विविध पुरस्कार प्राप्त होत आहेत. त्यामुळे प्लॅन सिटी म्हणून नवी मुंबईचा नावलौकिक होत आहे. नवी मुंबई मध्ये अनेक ठिकाणी ग्रोथ इंजिन उभे राहत आहे. महाराष्ट्राच्या ग्रोथ इंजिनमध्ये नवी मुंबई ही अश्व शक्ती आहे. सुनियोजित विकास कामे होत आहेत. आंतरराष्ट्रीय विमानतळ सुध्दा लवकर होणार आहे. यावरुन विकासाचा मार्ग टेक ऑफ घेणार आहे. पायाभूत सुविधा, धार्मिक स्थळे, भूमीपुत्रांचा विकास असे अनेक उपक्रम सुरु झाले आहेत. पर्यावरणाचा समतोल राखीत राज्य सरकार पर्यावरण पूरक काम करीत आहे. राज्याला केंद्र शासनाचे देखील भक्कम पाठबळ मिळत आहे. केंद्राच्या अर्थसंकल्पामध्ये राज्यासाठी  भरीव तरतूद केली आहे. केंद्र शासन राज्य सरकारच्या पाठीशी आहे. ठाणे, रायगड आणि पालघर या तीनही जिल्ह्यांचा विकास व्हायला हवा. या जिल्ह्यांमध्ये उत्तम जागा, दळणवळाचे मार्ग, संपर्क यंत्रणा व कुशल मनुष्यबळ यांची उपलब्धता आहे. यामुळे राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात प्रकल्प येत आहेत. लोकांना रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध होत आहेत. सिंगल विंडो क्लियरन्स, कॅपिटल सबसिडी, उद्योगांना सुरक्षिततेची हमी, अशा विविध घटकांमध्ये राज्य पुढे येत आहे. त्यामुळे अर्थव्यवस्था सुदृढ होत आहे. इन्फ्रास्ट्रक्चर ची कामेही मोठ्या प्रमाणात होत आहेत.

      मुख्यमंत्री श्री.शिंदे यांनी नवी मुंबई महानगरपालिका आणि सिडकोचे अभिनंदन केले. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते करायचे आहे. विमानतळाचे काम लवकरात लवकर करावे. विमानतळ नवी मुंबईच्या विकासामध्ये भर घालणारे आहे. लोकांचे म्हणणे काय,  लोकांचे हित कशामध्ये आहे, यासाठी आपण काम करीत आहोत. त्यादृष्टीनेच हे शासन लोकांच्या हिताचे विविध निर्णय घेत आहे.

       याप्रसंगी नवी मुंबई महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रातील विविध नागरी सुविधा प्रकल्पांची चित्रफितीद्वारे माहिती देण्यात आली. त्याचप्रमाणे कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त राजेश नार्वेकर यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते  छत्रपती शिवाजी महाराज नियोजित पूर्णाकृती पुतळा, से.10 ए, ऐरोली शिलान्यास, घणसोली येथे पामबीच मार्गावर घणसोली ऐरोली खाडीपूल बांधणे भूमीपूजन, नमुंमपा क्षेत्र सीसीटीव्ही यंत्रणा व कमांड सेंटर, नमुनपा मुख्यालय लोकार्पण,  से.38, सीवूड नेरुळ येथील ज्येष्ठ नागरिक काळजी केंद्र इमारत लोकार्पण, अमृत योजना 2.0 अंतर्गत सुविधा कामांचे भूमीपूजन, मलउदंचन केंद्रांची पुनर्बांधणी-20 से 25 बेलापूर. से. 1 ए शिरवणे, मलउदंचन केंद्रांची पुनर्बांधणी-से. 9 सानपाडा, से. 3 वाशी, से. 12 वाशी, से.28 वाशी, मलउदंचन केंद्रातील पम्पिंग मशिनरी बदल से. 6 बेलापूर, से.4 नेरुळ, से. 30 वाशी, मलउदंचन केंद्रातील पम्पिंग मशिनरी बदल से. 1 ए कोपरखैरणे, से. 2ए कोपरखैरणे, यादवनगर, ऐरोली येथे 2 द.ल.लि. क्षमतेचा पॅकेज ट्रिटमेंट प्लान्ट उभारणे, से.12 बेलापूर येथे 7.5 द.ल.लि. क्षमतेचा टर्शिअरी ट्रिटमेंट प्लान्ट उभारणे, बेलापूर विभागात 24 x 7 पाणीपुरवठा योजना, बेलापूर विभागात ज्वेल ऑफ नवी मुंबई आणि कोपरखैरणे विभागात से. 19 धारण तलाव पुनरुज्जीवन व सुशोभिकरण, भोकरपाडा जलशुध्दीकरण केंद्र येथे 150 द.ल.लि. क्षमतेचे फिल्टर वेड बांधणे, नमुंमपा क्षेत्रातील रस्त्यांची यांत्रिकी पद्धतीने साफसफाई करणे,, से. 30 व शाळा इमारत लोकार्पण, से. 15 घणसोली येथील शाळा इमारत लोकार्पण, से. 14, कोपरखैरणे नागरी आरोग्य केंद्र इमारत लोकार्पण, से.3. ऐरोली येथील अग्निशमन केंद्र इमारत लोकार्पण, विष्णुदास भावे नाटयगृह, वाशी येथील ग्रंथालय लोकार्पण, से. 22, तुर्भे येथील नियोजित विभाग कार्यालय इमारत भूमीपूजन नमंमपा परिवहन उपक्रम, तुर्भे आगार प्रशासकीय इमारत लोकार्पण या विकासकामांचे ऑनलाईन भूमीपूजन व लोकार्पण संपन्न होत आहे, असे सांगितले.

00000

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here