पहिल्या टप्प्यात ६६७ दिव्यांगाना मिळाले फिरते दुकान
मुंबई ,दि.१६:- दिव्यांगाना स्वावलंबी होण्याच्या दृष्टीने पर्यावरणस्नेही व्हेईकल उपलब्ध करून देण्याच्या योजनेचे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य मंत्री उपस्थित होते.
सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे मंत्रीमंडळ बैठकीनंतर श्रीमती पुष्पा सागर कांबळे, माणिक रामचंद्र भेरे,धनाजी बळवंत दळवी, मधुकर हरी बोंद्रे, चंचल गोपाळ दुपारे ( सर्व जि. ठाणे) या दिव्यांग व्यक्तींना स्वावलंबी होण्याच्या दृष्टीने हरित उर्जेवर चालणाऱ्या पर्यावरणस्नेही फिरते दुकानांच्या चाव्या सुपूर्द करण्यात आल्या.
यावेळी दिव्यांग कल्याण विभागाच्या अद्ययावत वेबसाईटचे उद्घाटन देखील करण्यात आले.
महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळातर्फे दिव्यांगजनांना स्वावलंबी होण्याच्या दृष्टीने पर्यावरणस्नेही फिरते दुकान (मोबाईल शॉप ऑन व्हेईकल) उपलब्ध करून देण्याच्या योजना राबविण्यात येणार आहे.
मोबाईल शॉप ऑन व्हेईकल ही राज्य शासनाची योजना या महामंडळामार्फत राबविण्यात येत आहे.
या योजनेत पहिल्या टप्प्यात पात्र दिव्यांगजनांपैकी ६६७ अर्जदार दिव्यांग व्यक्तींना पर्यावरणस्नेही फिरते दुकान (मोबाईल शॉप ऑन व्हेईकल) उपलब्ध करून देण्यात येत आहे. दिव्यांगत्वाचे प्रमाण अतितीव्र असेल अशा दिव्यांगजनांना प्रथम प्राधान्य देण्यात येईल. प्रत्येक जिल्हयातील दिव्यांगजनांमधून लोकसंख्येच्या प्रमाणात संपूर्ण पारदर्शक प्रक्रिया राबवून लाभार्थ्यांची निवड केली जाते आहे.
पर्यावरणस्नेही दुकानासह मिळाली चाकाची खुर्ची
यावेळी लाभार्थी दिव्यांग यांच्याकडे चाकाची खुर्ची नसल्याचे लक्षात येताच मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी निर्देश दिले. त्यावर मुख्यमंत्री जनकल्याण कक्षाकडून माणिक रामचंद्र भेरे यांना तातडीने चाकाची खुर्ची उपलब्ध करून देण्यात आली. मुख्यमंत्री श्री. शिंदे, उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस, कृषी मंत्री धनंजय मुंडे , सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे, जनकल्याण कक्षाचे राज्याचे प्रमुख डॉ. अमोल शिंदे उपस्थित होते. पर्यावरणस्नेही फिरते दुकानासह चाकाची खुर्ची मिळाल्याने भेरे यांच्यासह त्यांच्या कुटुंबियांनी आनंद व्यक्त केला.
0000