निवडणुकीच्या तयारीसंदर्भात चंद्रपूर जिल्हाधिकाऱ्यांकडून नोडल अधिकाऱ्यांच्या कामकाजाचा आढावा

चंद्रपूर दि. 18 : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केल्यानंतर जिल्ह्यात निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली आहे. 13-चंद्रपूर लोकसभा मतदार संघाची निवडणूक पहिल्या टप्प्यात म्हणजे 19 एप्रिल 2024 रोजी होणार आहे. या अनुषंगाने जिल्हास्तरीय नोडल अधिकारी नियुक्त करण्यात आले असून जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी सर्व नोडल अधिकाऱ्यांच्या कामकाजाचा आढावा घेतला.

नियोजन भवन येथे बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, जिल्हा पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अतिरिक्त जिल्हाधिकारी श्रीकांत देशपांडे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक रिना जनबंधू, उपजिल्हा निवडणूक अधिकारी सुभाष चौधरी, निवासी उपजिल्हाधिकारी संजय पवार, उपजिल्हाधिकारी दगडू कुंभार, मनपा आयुक्त विपीन पालीवाल  यांच्यासह सहा. निवडणूक अधिकारी, उपविभागीय अधिकारी, उपविभागीय पोलिस अधिकारी, तहसीलदार व इतर विभागाचे विभाग प्रमुख आदी उपस्थित होते.

यावेळी मार्गदर्शन करतांना जिल्हाधिकारी श्री. गौडा म्हणाले, जिल्ह्यात 17 विषयांसाठी नोडल अधिका-यांची नेमणूक करण्यात आली आहे. त्यांच्या सहकार्यासाठी इतरही अधिकारी नियुक्त करण्यात आले असून प्रत्येकाने आपापली जबाबदारी गांभियाने पार पाडावी. निवडणूक हा कालबध्द कार्यक्रम असून चंद्रपूर लोकसभा मतदार संघाची निवडणूक पहिल्याच टप्प्यात आहे. त्यामुळे प्रत्येकाने सुक्ष्म नियोजन करून त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सुचनांचे वाचन करणे आवश्यक आहे. त्यानुसारच काम करणे अपेक्षित आहे. यात वेळी कोणताही हलगर्जीपणा चालणार नाही. काही शंका असल्यास त्या विचारून घ्याव्यात.

पुढे जिल्हाधिकारी म्हणाले, सर्व सहायक निवडणूक अधिका-यांनी आपापल्या विधानसभा क्षेत्रातील स्ट्राँग रुमची पाहणी करावी. तेथील बंदोबस्त, सीसीटीव्ही कॅमेरे, स्ट्राँगरुमची सुरक्षितता आदी बाबी तपासून घ्याव्यात. तसेच आपापल्या क्षेत्रातील फिरते निगराणी पथक (एफ.एस.टी.), स्थायी निगराणी पथक (एस.एस.टी.), व्हीडीओ निगराणी पथक (व्ही.व्ही.टी.), व्हिडीओ पाहणी पथक (व्ही.एस.टी.) त्वरीत कार्यान्वित करून पथकांच्या पॉईंटवर भेट द्यावी. सोबतच आपल्या कार्यक्षेत्रात विविध परवानग्यांसाठी एक खिडकी योजना आणि नियंत्रण कक्ष स्थापन करावा. पोलिंग पार्टीचे प्रशिक्षण अतिशय गांभिर्याने घ्यावे, जेणकरून मतदानाच्यावेळी कोणत्याही चुका होऊ नये. मतदान केंद्रावर किमान मूलभूत सुविधा जसे, पिण्याचे पाणी, शौचालय, दिव्यांग मतदारांसाठी रॅम्पची आणि व्हीलचेअरची व्यवस्था करावी, अशा सुचना जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी दिल्या.

यावेळी प्रत्येक नोडल अधिकाऱ्यांनी आपापल्या कामकाजाचे सादरीकरण केले.

००००००