आचारसंहिता काळात शासकीय परिसरात मिरणूका, घोषणा व सभा आयोजनास निर्बंध

0
12

नागपूर, दि. 18 :  जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये, संस्था आणि शासकीय विश्रामगृहाच्या परिसरात मिरवणुका काढणे, घोषणा तसेच सभा घेण्यास निर्बंध घालण्याचे आदेश जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी निर्गमित केले आहेत. हे आदेश 6 जूनपर्यंत अंमलात राहणार आहेत.

भारत निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी निवडणूक कार्यक्रम 16 मार्च रोजी घोषित केला आहे. निवडणुक कार्यक्रम घोषीत केल्याच्या दिनांकापासून आदर्श आचारसंहिता अंमलात आली आहे. जिल्ह्यातील लोकसभा सार्वत्रिक निवडणुक 2024 ची संपूर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्याय वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टिकोनातुन जिल्हादंडाधिकारी, उपविभागीय अधिकारी, तालुका दंडाधिकारी कार्यालय तसेच जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालय, संस्था आणि शासकीय विश्रामगृहाच्या आवारामध्ये कोणत्याही राजकीय पक्षाने, निवडणूक लढविणाऱ्या उमेदवाराने किंवा त्यांच्या प्रतिनिधीने किंवा त्यांच्या हितचिंतकाने सभा घेणे, आवाराचा वापर राजकीय कामासाठी करणे किंवा रॅली काढणे, निवडणुकीसंदर्भातील पोस्टर्स, बॅनर्स, पॉम्प्लेट्स, कटआऊट, पेंटिंग्स, होर्डिंग्स लावणे, निवडणूक विषयक घोषवाक्य लिहिणे, आवारात निवडणूकविषयक घोषणा देणे किंवा मतदाराला प्रलोभन दाखविणे तसेच निवडणुकीच्या कामात बाधा निर्माण होईल अशी कृती करण्यास निर्बंध घालण्यात आले आहे.

फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये निवडणुक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत 6 जूनपर्यंत निर्बंध घालण्यात आले असल्याचे आदेश जिल्हादंडाधिकारी डॅा. विपीन इटनकर यांनी दिले आहेत.

जिल्ह्यातील १ लाख ७० हजार महिलांनी अमिषाला बळी न पडता मतदान करण्याची घेतली शपथ 

मतदान प्रक्रियेत महिलांचा सहभाग वाढविण्यासाठी स्वीप अंतर्गत व्यापक जनजागृतीवर भर – जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा

 नागपूर, दि. 18 : सक्षम लोकशाहीसाठी मतदान प्रक्रियेत सर्वांचा सहभाग याला अनन्य साधारण महत्त्व आहे. मतदान प्रक्रियेत महिलांच्या मतदानाचे प्रमाण व उत्स्फूर्त सहभाग वाढावा यादृष्टीने स्वीप अंतर्गत व्यापक जनजागृतीवर भर देण्यात आला आहे. यासाठी आज संपूर्ण जिल्हाभर ग्रामीण व शहरी भागात महिलांसाठी विशेष मोहीम घेण्यात आली होती. यात जिल्ह्यातील सुमारे 1 लाख 70 हजार महिलांनी लोकशाहीला सशक्त व सक्षम करण्यासाठी भयमुक्त व शांततापूर्ण वातावरण जपून मतदानाचे पावित्र राखून कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता मतदान करण्याची प्रतिज्ञा घेतली.

 या मोहिमेसाठी जिल्ह्यातील प्रत्येक पंचायत समिती अंतर्गत ग्रामपंचायत निहाय तर शहर व महानगरासाठी नगर परिषद, महानगरपालिकामार्फत वार्डनिहाय नियोजन केले होते. जिल्ह्यातील सुमारे 1 हजार 41 गावांमधून या मोहिमेला उत्स्फूर्त सहभाग मिळाला. 15 हजार 126 बचत गटांमार्फत मतदान प्रक्रियेत महिलांच्या सहभागावर भर देण्यात आला. 1 हजार 729अंगणवाडी सेविका आणि आशा वर्कर यांनी मतदानाचे प्रमाण वाढावे व विशेष करुन कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता निर्भयपणे मतदानाला पुढे यावे यादृष्टीने मतदार साक्षरतेत सहभाग घेतला.

  लोकशाही प्रक्रियेत महिलांचा सहभाग हा अत्यंत मोलाचा आहे. प्रत्येक महिलेला मिळालेल्या मतदानाच्या हक्काचे पालन करता यावे यासाठी संधी मिळणे आवश्यक आहे. जिल्ह्यातील पात्र असलेल्या कोणत्याही मतदाराला मतदानापासून वंचित राहता कामा नये यादृष्टीने स्वीप अंतर्गत आम्ही नियोजन केले आहे. टप्प्याटप्प्याने प्रत्येक क्षेत्रात मतदारांच्या साक्षरतेवर आम्ही अधिक भर देत असल्याचे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा यांनी सांगितले.

                                                                        ******

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here